सभेत बोलताना ‘या’ आमदारांना अर्धांगवायूचा झटका
अकोला : एका सभेत गाणे गात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे अकोला दाै-यावर होत्या. मिटकरी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाकड राहिली,माझ्या मनाची होतीया काहीली’ हे गीत खड्या आवाजात म्हणायला त्यांनी सुरुवात केली; परंतु काही काही क्षणात त्यांचा आवाज चिरका व्हायला लागला. तोंड किंचित वाकडे व्हायला लागले. हे उपस्थितांच्या लक्षात आल्यानंतर एकच गोंधळ झाला. त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिटकरी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून चिंता करण्यासारखे काही नसल्याचं त्यांनी स्वतःच सांगितलं. स्वतःचा जीव धोक्यात घालून मला भेटायला येवू नये अशी विनंती मिटकरी यांनी सर्वांना केली आहे. मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. खासदार अमोल कोल्हे व त्यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या वक्तृत्वशैलीच्या जोरावर त्यांना स्टार प्रचारक आणि आमदारही होता आलं.