वाहऽऽ ठाणेदार साहेब..!; पोलीस ठाण्यात लागला चक्‍क प्रेमविवाह अन्‌ ठाणेदारांनी केले कन्यादान!!

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात नुकताच एक अनोखा प्रेमविवाह पार पडला. ठाणेदार प्रदीप काळे यांनी या आगळ्या वेगळ्या सोहळ्यात चक्क कन्यादान केले. अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावातील सचिन आणि त्याच गावातील यल्लवी या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. सचिन हा बांधकामावर गवंडी म्हणून काम करतो तर यल्लवी तिथे मजूर म्हणून काम करते. दोघांचे प्रेम …
 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात नुकताच एक अनोखा प्रेमविवाह पार पडला. ठाणेदार प्रदीप काळे यांनी या आगळ्या वेगळ्या सोहळ्यात चक्‍क कन्यादान केले.

अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावातील सचिन आणि त्याच गावातील यल्लवी या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. सचिन हा बांधकामावर गवंडी म्हणून काम करतो तर यल्लवी तिथे मजूर म्हणून काम करते. दोघांचे प्रेम चांगलेच बहरले. लग्नाच्या आणाभाका घेतल्या. लग्नाचे वय झाल्यानंतर यल्लवीने सचिनकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र सचिनने लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे यल्लवीने थेट पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार प्रदीप काळे यांनी सचिनला बोलावून घेतले. तेव्हा मी लग्नासाठी तयार आहे.

मात्र आंतरजातीय विवाह असल्याने घरचे विरोध करतात, असे सचिनने सांगितले. सचिनच्या घरच्यांना मग पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले. त्यांचे समुपदेशन करण्यात आले. आजच्या आजच लग्न लावायचे, असा निर्णय ठाणेदारांनी घेतला. नवरीचे कपडे, नवरदेवाचे कपडे, बाशिंग असे सर्व साहित्य जमा करण्यात आले. भटजीला सुद्धा बोलाविण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा अनोखा विवाह पार पडला. स्वतः ठाणेदार प्रदीप काळे यांनी कन्यादान केले. लग्नानंतर जेवणाच्या पंगती उठल्या. त्यानंतर खास सजवलेल्या वाहनातून नवरदेव नवरीला त्यांची गावी पाठवण्यात आले… या विवाहाची अन्‌ ठाणेदारांच्‍या अनोख्या कायद्याच्‍या भाषेची सध्या जिल्ह्यात कौतुकाने चर्चा होत आहे.