राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप
परभणीचे पदाधिकारी राजेश विटेकर अडचणीत; तृप्ती देसाईंकडून कारवाईची मागणी
परभणी/ पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अनेक नेत्यांची कारकिर्द व भवितव्य धोक्यात आले आहे.वनमंत्री संजय राठोड यांना अशाच एका प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. तर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची खुर्ची थोडक्यात बचावली. आता परभणी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेश विटेकर यांच्यावर एका महिलेने वर्षभरापासून लैंगिक शोषण केल्याचा तसेच पक्षाचे नेते शरद पवार यांचे नाव घेऊन धमकावल्याचा आरोप केला आहे. सदर महिलने भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांच्या उपस्थितीत पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यात विटेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी तसेच पक्षाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान विटेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. राजेश विटेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत.लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. पण शिवसेनेचे खा. संजय जाधव यांनी त्यांचा पराभव केला होता. विटेकर हे जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष असून सध्या ते जिल्हा बँकेचे संचालक तसेच सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. तसेच त्यांच्या मातोश्री सध्या परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. सदर महिलेने केलेल्या तक्रारीनुसार विटेकर हे गेल्या वर्षभरापासून अत्याचार करत होते. त्यांनी पीडितेचे अश्लील व्हिडिओज तयार केले आहेत. त्यासंदर्भात आपण दिलेल्या तक्रारीआधारे पोलीस गुन्हा दाखल करून घेत नसून केवळ चौकशी सुरू असल्याचे सांगत आहेत. विटेकर यांनी शरद पवारांचे नाव घेऊन आपल्याला धमकावल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत केला आहे.