राज्‍याची बातमी : तो म्‍हणाला, बायको आता मी कधीच पिणार नाही…; तिने घटस्‍फोटाच्‍या २० वर्षांनी पुन्‍हा त्‍याच्‍या गळ्यात टाकली वरमाला!

अमरावती : २० वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. मात्र नवरा दारुडा निघाल्याने तिने घटस्फोट घेतला होता. त्यानंतर दुसऱ्याशी लग्न केले, तोही बेवडा निघाल्याने त्यालाही काडीमोड देऊन ती माहेरीच राहत होती. अखेर १३ वर्षांनंतर तिचा पहिला नवरा पुन्हा तिच्या आयुष्यात आला आहे. यावेळी त्याने दारू न पिण्याचे वचन दिल्याने नातेवाइकांनी दोघांचा पुनर्विवाह लावून दिला आहे. अमरावती …
 

अमरावती : २० वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. मात्र नवरा दारुडा निघाल्याने तिने घटस्फोट घेतला होता. त्यानंतर दुसऱ्याशी लग्न केले, तोही बेवडा निघाल्याने त्यालाही काडीमोड देऊन ती माहेरीच राहत होती. अखेर १३ वर्षांनंतर तिचा पहिला नवरा पुन्हा तिच्या आयुष्यात आला आहे. यावेळी त्याने दारू न पिण्याचे वचन दिल्याने नातेवाइकांनी दोघांचा पुनर्विवाह लावून दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा या गावात नुकताच हा अनोखा विवाह झाला.

मुऱ्हा येथील सुगंधाचे लग्न २० वर्षांपूर्वी अकोला जिल्ह्यातील लाखपुरी येथील संतोष जामनिक याच्याशी झाला होता. संतोष तेव्हा २७ वर्षांचा तर सुगंधा २० वर्षांची होती. सात वर्षे सुखात संसार चालू होता. मात्र नंतर संतोषला दारू पिण्याची सवय लागली. त्यामुळे सुगंधा संतोषला सोडून माहेरी आली. तिने दुसरे लग्न केले. मात्र तोही बेवडा निघाल्याने ती पुन्हा माहेरीच आई- वडिलांच्या घरी राहू लागली. इकडे संतोष मात्र १३ वर्षांपासून पत्नीशिवाय कसेतरी जगत होता. १३ वर्षांनंतर संतोष सुगंधाच्या आई- वडिलांना भेटायला आला. पुन्हा सुगंधाने माझ्या आयुष्यात सुगंध आणावा व पुनर्विवाह करावा, अशी इच्छा त्याने व्यक्त केली. आता आयुष्यात पुन्हा दारू कधीच पिणार नाही, असे वचन संतोषने दिले. सुगंधा आणि तिच्या आई- वडिलांनीही होकार दिला अन्‌ दोघांचं लगीन पुन्‍हा एकदा लागलं.