भाजपच्या बदनामीसाठी चीनने दिलेय पैसे; फडणवीसांचा आरोप
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्तारातून सर्वधर्म आणि सर्व गटांना प्रतिनिधित्व दिलं. सरकार चांगलं काम करीत असताना या सरकारच्या कामात खोडा घालायचा. अधिवेशन चालू द्यायचे नाही. यासाठी एक-दोन मीडिया हाऊसेसला चीनमधून पैशाचा पुरवठा केला जात आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बदनाम करण्याचा अजेंडा राबविला जात आहे, असा आरोप करून ते म्हणाले, की विरोधी पक्ष माध्यमांतील वृत्तांच्या आधारे अधिवेशनच होऊ द्यायला तयार नाहीत. काही मीडिया हाऊसेसनी पेगॅससच्या बातम्या दाखवल्या, छापल्या. काहींनी यादी दिली; परंतु या बातम्यांना कोणताही आधार नाही. पुरावे नाहीत. भारत सरकारची कोणतीही संस्था अशा पद्धतीचं हॅकिंग करत नाही. टेलिग्राफ कायद्यानुसार आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते. त्यामुळे असं काही करण्याची गरज नाही. संबंधित विभागानं अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत. तपासानंतर लवकरच सत्य बाहेर येईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.