बाप रे बाप… किती हे साप… आधी अंथरूणात पिल्लू, नंतर किचनमध्ये २२ विषारी कोब्रा!
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील उत्तमसरा (ता. भातुकली) गावात एका घरात तब्बल २२ विषारी कोब्रा साप निघाले. आधी दाराजवळ कात दिसली होती. झोपण्यासाठी अंथरून टाकताना सापाचे पिल्लू दिसले. मग लागोपाठ तब्बल २२ साप विषारी साप समोर आले.
मंगेश सायंके यांना हा धक्कादायक अनुभव आला. काही दिवस बाहेरगावी राहून परत आल्यानंतर दाराजवळ सापाची कात दिसली होती. मात्र त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. मात्र रात्री अंथरून टाकताना त्यांच्या पत्नी मंदा सायंके यांना सापाचे पिल्लू दिसले.
त्यांनी आरडाओरडा करत मुलांना घेऊन बाहेर धाव घेतली. सर्पमित्र भूषण सायंके यांना माहिती देण्यात येताच त्यांनी घटनास्थळी येऊन हे पिल्लू ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाकघरात सापाची आणखी दोन पिल्ले आढळली. त्यामुळे ही पिल्लही कोब्रा असल्याने ज्या ठिकाणी ही पिल्लं आढळली तिथला तुराट्याचा कूड बाजूला करण्यात आला आणि तब्बल २२ सापाची पिल्लं दिसून आली. ही सर्व पिल्लं पकडून जंगलात सोडण्यात आली आहेत.