पेट्रोल टाकून दोन पोलिसांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न
लायसन्स विचारल्याने कणकवलीतील संतप्त युवकाचे कृत्य
रत्नागिरी : कोरोनाकाळात रस्तावरील गर्दी नियंत्रित करण्याचे काम पेलिसांना स्वत:च्या जीवावर उदार होऊन करावे लागत आहे. कणकवलीतील पटवर्धन चौकात दुचाकी, चारचाकी वाहनांची कागदपत्रे तपासणार्या दोन पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न एका माथेफिरू तरुणाने केला आहे. काही लोकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार पोलीस कर्मचारी चंद्रकांत माने व विश्वजीत परब हे ड्यूटीवर होते. त्यांनी दुचाकची राँगसाईड येणार्या तरुणांना अडविले व त्यांच्याकडे वाहतूक परवाना व इतर कागदपत्रांची मागणी केली. त्यांच्याकडे ती नव्हती. पण कागदपत्रे विचारली म्हणून संतापलेल्या तरुणाने थोडे पुढे जाऊन बाटलीतून डिझेल आणले व ते हवालदारांच्या अंगावर होतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. जवळच उभ्या असलेल्या आरोग्यसेवक साळुंके यांनी त्या तरुणाला पकडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी आरोपी युवकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.