पत्रकाराच्या हत्येने नगर जिल्हा हादरला
अपहरणानंतर जबर मारहाण करून केला खून; राजकीय पदाधिकार्याचा हात असल्याचा पत्नीचा आरोप
नगर : नगर जिल्हा राजकीय गुंडगिरीसाठी प्रसिद्ध आहे.एका सामाजिक संघटनेच्या महिला पदाधिकार्याच्या हत्याप्रकरणात एका दैनिकाच्या संपादकाला मुख्य सूत्रधार म्हणून अटक करण्यात आल्याचे प्रकरण सध्या या जिल्ह्यात गाजत असतानाच मंगळवारी रात्रीr अपहरणानंतर एका साप्ताहिकाचा पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्त्याची अपहरणानंतर जबर मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका राजकीय पदाधिकार्याचा हात असल्याचा संशय असून तसा आरोप पत्रकाराच्या पत्नीने केला आहे. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.
राहुरी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार रोहिदास दातीर यांचे मंगळवारी दुपारी एका वाहनातून आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. अपहरणानंतर त्यांना जबर मारहाण करण्यात आली. घटनास्थळी त्यांची दुचाकी व चप्पल आढळून आली. मंगळवारी रात्री उशीरा त्यांचा मृतदेह राहुरी कॉलेज रोड परिसरात आढळून आला. त्यावेळी त्यांना अमानूष मारहाण झाल्याचे लक्षात येत होते. दरम्यान या हत्याप्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली असून दातीर यांच्या पत्नी कविता यांनी राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यक्तीने आपल्या पतीची हत्या केली. याआधीही त्यांच्यावर अनेकदा हल्ला झाला होता, अशी माहिती पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.