किती ही भयानक शोकांतिका… दरड कोसळल्याने हॉस्पिटलला जायला रस्ताच नव्हता… पत्नीला खांद्यावर घेऊन पायी निघाला… पण दुर्दैवाने अर्ध्यावरच सोडली साथ!
नंदुरबार : पत्नीला दवाखान्यात घेऊन जात असताना दरड कोसळली. त्यामुळे रस्ता बंद झाला. शेवटी पतीने तिला वाचवण्यासाठी स्वतःच्या खांद्यावर घेत चिखल मातीचा रस्ता पायी तुडवत पायी हॉस्पिटल गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळेत हॉस्पिटलला पोहचू न शकल्याने पत्नीचा मृत्यू झाला. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासीबहूल चांदसौली येथे ही घटना समोर आली आहे.
चांदसौली येथील सिदलीबाई पाडवी यांच्या पोटात दुखत होते. त्यामुळे नातेवाईक त्यांना उपचारासाठी घेऊन जात होते. त्याचवेळी मुसळधार पावसामुळे धडगाव तालुक्यातील चांदसौली येथील दरड कोसळली. त्यामुळे घाटातील रस्ता बंद झाल्याने शहरात जाण्याची दुसरा रस्ताच नव्हता. पत्नीला वाचवण्यासाठी पतीची धडपड सुरू होती. दुसरा पर्यायच नसल्याने पतीने पत्नीला खांद्यावर घेतले व चिखल माती तुडवत पायीच हॉस्पिटल गाठण्याचा प्रयत्न केला.अधून मधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने सिदलीबाई यांची तब्येत आणखी खराब होत होती. अखेर वेळेत उपचार न मिळू शकल्याने सिदलीबाई यांचा वाटेतच मृत्यू झाला. आदिवासीबहुल भागातील आरोग्य सुविधांचे चिंताजनक वास्तव पुन्हा यानिमित्ताने समोर आले आहे. विशेष म्हणजे राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड के. सी. पाडवी यांच्या मतदारसंघात ही घटना घडली आहे.