आमदार श्वेताताई महाले पाटील मुंबईत स्थानबद्ध!; आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतले!!
मुंबई (ज्योती सूर्यवंशी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणी एका मंत्र्याकडे संशयाची सुई वळते आहे. या मंत्र्याची हकालपट्टी करून कारवाईच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने आज, 27 फेब्रुवारीला राज्यभरात ‘चक्का जाम आंदोलन’ केले. नवी मुंबईत वाशी टोलनाक्यावर चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले या आंदोलनाचे नेतृत्त्व करत होत्या. पोलिसांनी त्यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. तब्बल 3 तास पोलीस ठाण्यात ठेवल्यानंतर दुपारी 4 च्या सुमारास सर्वांना सोडून देण्यात आले.
आंदोलनात नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र बा. घरत, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. दुर्गाताई ढोख, माजी अध्यक्षा सौ. वर्षाताई भोसले, प्रदेश सदस्या सौ कल्पनाताई शिंदे, महामंत्री सौ. कल्पनाताई छत्रे आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग होता. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एका मंत्र्यांच्या आवाजातील अनेक व्हाईस कॉल संभाषण व्हायरल झाल्याने संशय वाढत आहे . परंतु सरकार कडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. वाशी टोलनाका येथील आंदोलनाची जबाबदारी आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्यावर सोपविण्यात आली होती . त्यानुसार श्वेताताई महाले पाटील चक्का जाम आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासूनच आंदोलन सुरू झाल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. वाशी पोलिसांनी हस्तक्षेप करत आमदार सौ. महाले पाटील यांच्यासह सर्व आंदोलकांना स्थानबद्ध करून पोलीस ठाण्यात आणले. दुपारी 4 च्या सुमारास सर्वांना सोडून देण्यात आले.