आदित्य ठाकरेंना झाला कोरोना
मुंबई : महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली असून आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जे संपर्कात आले असतील त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. आदित्य ठाकरेंना कोरोना झाल्याने राजकीय वर्तुळात अस्वस्थता आहे. कारण ठाकरे हे सरकारचे दैनंदिन कामकाज, मंत्रिमंडळाच्या नियमित बैठका तसेच इतर कार्यक्रमांत सहभागी होत असतात. त्यामुळे अनेक जण त्यांच्या संपर्कात आले असण्याची शक्यता आहे. सौम्य लक्षण जाणवत असल्याने आपण कोरोनाची चाचणी घेतली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे नमूद करून ठाकरे यांनी नागरिकांना कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्याचे तसेच मास्क,सॅनिटायझर वापरण्यात कोणतीही कुचराई करू नये, असे आवाहन केले आहे. राज्य मंत्रिमंडळातील नेते राजेश टोपे,अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड,धनंजय मुंडे, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे आदी मंत्र्यांना याआधी कोरोनाची लागण झालेली आहे.