अहो आश्चर्यम! भुजबळ फडणवीसांच्या घरी!
मुंबई ः विधिमंडळाच्या गेल्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून एकामागून एक वार करणारे राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ या काका पुतण्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी तब्बल एक तास चर्चा केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजप-शिवसेनेचे सरकार असताना आणि गृहमंत्रिपद फडणवीस यांच्याकडे असताना सार्वजनिक बांधकाम खात्यातील कथित घोटाळा आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी भुजबळ काका पुतण्यांना ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. हे दोघेही प्रदीर्घ काळ तुरुंगात होते. भाजपने हे घडवून आणल्याचा आरोप होता. या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांनी फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर जाऊन इतर मागासांच्या आरक्षणाबाबत चर्चा केल्याचे सांगितले जाते. फडणवीस वारंवार मी पुन्हा येईन, करेक्ट कार्यक्रम होईल, असे सांगत असतात. महाविकास आघाडीचे सरकार पडेल असे सांगतात. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे दोन नेते आरक्षणाच्या निमित्त काढून फडणवीस यांना भेटले असल्याचे सांगितले जात असले, तरी राजकीय निरीक्षक मात्र तेवढ्यापुरतीच ही भेट होती का, याबाबत प्रश्न उपस्थित करीत आहेत.अहो आश्चर्यम! भुजबळ फडणवीसांच्या घरी!