दोघांत तिसरी... नवऱ्याचे बिझनेस पार्टनरसोबत अफेअर; म्‍हणाला, तुला जायचे तर जा, तिला सोडणार नाही!
 

 
मुंबई : जय आणि जसविंदर यांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम. योगायोगाने घरच्यांची संमती मिळाल्याने दोघांचा प्रेमविवाह अरेंज मॅरेज पद्धतीने दोन वर्षांपूर्वी झाला. लग्नानंतर मात्र जयच्या संसारात त्याची बिझनेस पार्टनर असलेली तरुणी प्रिया (नाव बदलले आहे) जरा जास्तच हस्तक्षेप करू लागली. जयसुद्धा जास्त काळ प्रियासोबतच राहू लागला. त्यामुळे दोघांच्या संसारात खटके उडू लागले. जय पत्नीला मारहाण करू लागला. व्हायचा तो परिणाम झाला. पत्नी माहेरी निघून गेली अन्‌ तिने थेट पोलीस ठाण्यात नवऱ्याविरुद्ध तक्रार दिली.

जय सनथ राजदेव (२८, रा. विरार पश्चिम, पालघर, मुंबई) आणि जसविंदर (२४) यांचा प्रेमविवाह २५ फेब्रुवारी २०१९ रोजी झाला होता. जयचा होलसेल रेडिमेड कापडाचा व्यवसाय असून, जसविंदर येस बँकेत नोकरी करते. जयची एक बिझनेस पार्टनर आहे. त्या तरुणीला दोन मुली आहेत. तिच्याशी आपले घराप्रमाणे संबंध आहेत, असे जयने लग्नाआधीच जसविंदरला सांगितले होते. मात्र लग्नानंतर प्रियाचा घरात जास्तच हस्तक्षेप होऊ लागला, जसविंदरने तक्रारीत म्हटले आहे.

ती नेहमी जयसोबत फिरत होती. नेहमी जयच्या घरी येत होती. त्यामुळे तिच्याशी केवळ बिझनेससाठीच संबंध ठेव. तिला घरी येऊ देऊ नको, असे जसविंदरने जयला सांगितले होते. तेव्हा तुला जायचे असेल तर जा... मी प्रियाला नाही सोडणार... असे जय म्हणाला होता. सप्टेंबर २०१९ मध्ये जयने जसविंदरच्या भावाच्या नावाने ४ लाख २० हजार रुपयांचे कर्ज काढले होते. ते सर्व पैसे जयने प्रियाला दिले होते, असे तक्रारीत म्हटले आहे.

ऑक्टोबर २०१९ मध्ये बिझनेसच्या कामासाठी जय, जसविंदर, प्रिया आणि जयचा यश नावाचा मित्र दिल्लीला गेले होते. तेव्हा जयने प्रिया व ती तिच्या मुलींसाठी ७० ते ८० हजार रुपयांची खरेदी केली. घरी आल्यानंतर जास्त वेळ झोपलेली असते, असे म्हणत जय पत्नीला मारहाण करू लागला. तुझी आई तुला सतत फोन का करते या कारणावरून सुद्धा जय पत्नीला सतत मारहाण करत होता व अधिक वेळ हा प्रियासोबत घालवत होता, असे जसविंदरने तक्रारीत म्हटले आहे. जयच्या वागण्याला कंटाळून ती ४ डिसेंबर  २०२० रोजी माहेरी निघून गेली. त्यानंतर २५ डिसेंबर २०२१ रोजी तिने नवरा जयविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून जय सनथ राजदेवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.