आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत घेणार
 

आ. सौ. श्वेताताई महाले यांच्या प्रश्नावर परिवहनमंत्र्यांचे उत्तर
 
मुंबई ः असुरक्षित भवितव्य, कुटुंबाचा निर्माण झालेला उदरनिर्वाहाचा प्रश्न यामुळे राज्य परिवहन मंडळातील ५७ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याबाबत सकारात्मक असून, त्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली आहे.

आज, २३ डिसेंबरला आमदार सौ. महाले पाटील व इतर सदस्यांनी राज्य परिवहन महामंडळातील मृतांच्या वारसांना मोबदला देणे तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमित वेतन व वैद्यकीय देयके मिळण्याबाबतचा प्रश्न उपस्थित करून एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा सभागृहात मांडल्या. तारांकित प्रश्नाच्या चर्चेत सहभागी होताना आमदार सौ. महाले पाटील यांनी चिखली आगार व बुलडाणा जिल्ह्यातील इतर आगारांत काम करणाऱ्या एसटी मंडळातील कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले गत एक वर्षांपासून प्रलंबित आहेत. ती बिले केव्हा देणार? आणि इतके दिवस प्रलंबित ठेवण्याची कारणे कोणती? गत्‌ एका वर्षात राज्यातील ५७ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या कर्मचाऱ्याच्या वारसांना ५० लाख रुपये आर्थिक मदत देऊन त्यांच्या वारसांना शासकीय नोकरी देणार का? असे प्रश्न उपस्थित केले होते. त्‍यावर परब यांनी मेडिकल बिले अदा करण्याबाबत कार्यवाहीचे आश्वासन दिले.

आत्महत्या करू नका : आ. सौ. श्वेताताई महाले पाटील
कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे राज्यभरातील एसटी सेवा बंद होती. त्यामुळे सर्व वाहन चालक आणि इतर कर्मचारी कामावर येऊ शकले नाही. शासनाने त्यांना कोणतीही मदत दिली नाही. त्यानंतर शासनात विलिनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचारी गत दीड महिन्यापासून दुखवटा पाळत आहेत. स्वतःचे आणि कुटुंबाचे भवितव्य असुरक्षित असल्याने त्या नैराश्येतून राज्यातील एसटी महामंडळातील ५७ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या वारसांना कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे त्यांच्या वारसांसमोर उदरनिर्वाहाचा फार मोठा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. हेही दिवस निघून जाऊन सुखाचे दिवस येतील. त्यामुळे कुटुंबाला उघडे पाडून कुणीही आत्महत्या करू नका, असे भावनिक आवाहन यावेळी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केले आहे.