जिल्ह्यातील २२ हजार बहीणी एका महिन्यात झाल्या नावडत्या; लाडकी बहीण याेजना; अटी शर्थींचा बसला फटका, हजारो महिलांचा बारावा हप्ता थांबला!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर राज्य शासनाने आणलेली लाडकी बहीण याेजना यशस्वी झाली हाेती. या याेजनेमुळे युतीचे सरकार आले आहे. मात्र, आता जून महिन्यात जिल्ह्यातील २२ हजारावर लाडक्या बहीणी नावडत्या झाल्या आहेत. अटी आणि शर्थीचा आता लाडक्या बहीणींना फटका बसला आहे. अकरा महिन्यांत अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या २४ हजार ८४८ वर पोहोचली आहे.
योजना सुरू करताना सरकारने लाखो महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा करून मोठा राजकीय संदेश दिला होता. मात्र, आता शासनाने अटी-शर्तींच्या आधारे नव्याने पात्रता पडताळणी सुरू केल्यामुळे, हजारो लाभार्थ्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
ही आहेत अपात्रतेची कारणे?
घरात चारचाकी वाहन असणे, ६५ वर्षांहून अधिक वय असणे, शासनाच्या अन्य योजनांचा लाभ घेतलेला असणे (जसे की निराधार योजना) , एकाच रेशन कार्डवर दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतलेला, नोकरदार अथवा २.५ लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेला कुटुंबप्रमुख आदी कारणांमुळे अनेक लाभार्थी अपात्र ठरत आहेत. 
नविन नाेंदणी बंदच 
सध्या हजारो महिला, ज्यांनी नुकतीच वयाची २१ वर्षे पूर्ण केली आहेत, त्या अर्ज करण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, सरकारकडून योजनेसाठी निश्चित कालमर्यादा असल्याने नव्याने अर्ज स्वीकारले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या महिला "आम्ही लाडक्या बहिणी नाही का?" असा प्रश्न विचारत आहेत.