रणधुमाळीचा बिगुल वाजला! महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान मतदान! २३ नोव्हेंबरला गुलाल उधळला जाणार....
Updated: Oct 15, 2024, 16:03 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज उद्या म्हणता म्हणता अखेर निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला, त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे...
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला तारखेला मतदान होईल. निवडणुकीची अधिसूचना२२ ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. २९ ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येईल. ३० ऑक्टोबरला अर्जांची पडताळणी होईल. ४ नोव्हेंबरला उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल..
महाराष्ट्रात एकूण ९ कोटी ३ लाख मतदार असून १ लाख १८६ मतदान केंद्रे राहणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यावेळी म्हणाले. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना आपल्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती वर्तमानपत्रातून तीन वेळा द्यावी लागेल असेही राजीव कुमार म्हणाले.
८५ पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाकडून विशेष सुविधा दिल्या जाणार आहेत. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे राजीव कुमार यावेळी म्हणाले. निवडणुकीत. निवडणुकीत गैरकृत्य करणाऱ्या उमेदवारांची गय केली जाणार नाही असेही ते म्हणाले.