ते आमच्या घरचं लग्न, आम्ही कायबी करू... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
मुंबई ः शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊतचा काल, २९ नोव्हेंबरला विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापासून सर्वच छोट्यामोठ्या नेत्यांनी लग्नाला हजेरी लावली. लग्नाआधी झालेल्या संगीत कार्यक्रमात संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी एकत्र डान्स केला होता. या डान्सवरून झालेल्या टीकेला आता सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली असून, तो आमचा कौटुंबिक कार्यक्रम होता. खासगी कार्यक्रमात आम्ही काय करतो यावर कुणाला टीका करायचा अधिकार नाही. ते आमच्या घरातल्या मुलीचं लग्न होतं, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
रेनेसाँ या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला होता. एसटी कर्मचारी आत्महत्या करताहेत, शेतकरी आत्महत्या करताहेत आणि तुम्ही असंवेदनशीलपणे लग्नात नाचता, अशी टीका भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली होती. एकीकडे लोक आत्महत्या करताहेत. शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. गावे अंधारात आहे. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, असेही विखे पाटील म्हणाले होते. सोशल मीडियावरही सुप्रिया सुळे आणि राऊत यांच्या टीका झाली होती. सुप्रिया सुळे यांनी टीकाकारांनाच प्रत्युत्तर देत टीका करण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह झाला आहे. लग्नसोहळ्याचा थाटबाट डोळे दीपवणारा ठरला. कोट्यवधी रुपये या लग्नात खर्च करण्यात आल्याचे दिसून येते. एकीकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी मरत असताना, शेतकऱ्यांची वीज कापली जात असताना, कोरोनाच्या नव्या व्हायरसचे थैमान डोक्यावर संकटासारखे असताना लग्नात झालेल्या या खर्चाबद्दल टीका होत आहे. खर्च कसा आणि कुणी केला, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.