एक दुजे के लिए! लग्न होऊन दोनच दिवस झाले होते, माहेरी येऊन तिने प्रियकरासोबत गळफास घेतला! दोघांचे सोबत जगणे घरच्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी मरण्याचा निर्णय घेतला..!

 

जळगाव(लाइव्ह ग्रुप नेटवर्क):  ती १८ वर्षांची अन् तो १९ वर्षाचा..दोघांचे घर एकाच गल्लीत! त्या दोघांचे प्रेम जुळले अन् दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या..आता एक जन्मच काय सात जन्म सोबत रहायचं त्यांनी ठरवलं...त्यांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण तिच्या कुटुंबीयांना लागली...तिच्या घरच्यांचा या संबधाला विरोध होता..त्यामुळे तिचे लग्न ठरवले अन् झटपट लग्न उरकण्यात आले..तिचे लग्न ठरले तेव्हापासूनच तो बिचारा प्रचंड दुःखात होता..दरम्यान लग्न झाल्यानंतर दोन दिवसांनी सत्यनारायणाच्या पूजेसाठी ती माहेरी आली..दुसऱ्या दिवशी तिचा नवरा तिला घ्यायला येणार होता मात्र तिने आता सगळं काही ठरवूनच टाकलं होतं.. रात्री तिने तिच्या प्रियकराला फोन लावला, घराजवळच्या एका पडक्या शाळेत दोघांची भेट झाली अन् एकाच दोरीने दोघांनी गळफास घेऊन जीवन संपवलं..! 

जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा शहरात ही हादरवून टाकणारी घटना घडली आहे.  जितेंद्र राजू राठोड(१९) आणि साक्षी सोमनाथ भोई(१८) अशी आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगलांची नावे आहेत.. जितेंद्र आणि साक्षीने यंदा १२ वी परीक्षा दिली होती. दोघांचे प्रेमसंबंध होते. कुटुंबियांकडून दोघांच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळे घाईगडबडीत साक्षीचे लग्न लावून देण्यात आले, साक्षीला ते मान्य नव्हते.
  
 प्राप्त माहितीनुसार पाचोरा शहरातील वरखेड नाका परिसरात जितेंद्र त्याच्या कुटुंबीयांसोबत रहात होता. त्यांच्या घरापासून दोन घरे सोडून सक्षीचे घर होते. जितेंद्रचे आईवडील मजुरी तर साक्षीचे आईवडील मासेमारीचा व्यवसाय करतात. दोघेही एकाच गल्लीत राहणारे असल्याने दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र साक्षीच्या घरच्यांना हे संबंध मान्य नव्हते.

 त्यामुळे सक्षीचे लग्न दुसऱ्या तरुणाशी ठरवण्यात आले होते. घटनेच्या दोन दिवसाआधी साक्षीचे लग्न लावून देण्यात आले होते. सत्यनारायणाच्या पूजेसाठी साक्षी माहेरी आली.दुसऱ्या दिवशी सकाळी घराजवळच्या पडक्या शाळेत साक्षी आणि जितेंद्र गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

  प्राप्त माहितीनुसार साक्षीने रात्री जितेंद्रला फोन केला. तिच्या विरहाने शोकाकुल झालेला जितेंद्र तिला भेटायला घराजवळच्या पडक्या शाळेत आले. दोघांचे सोबत जगणे मान्य नसल्याने त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. जितेंद्रच्या पश्चात तीन बहिणी आणि आई वडील तर साक्षीच्या पश्चात दोन दिवसांपूर्वी ज्याच्याशी लग्न केले तो नवरा, आई वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.