समृद्धी महामार्गाच्या शॉर्टकट पोच रस्त्यासाठी स्थळ पाहणी अहवाल सादर करा; आमदार धीरज लिंगाडे यांच्या अभ्यासपूर्ण मागणीवर प्रशासकीय यंत्रणेकडून हालचाली; १० ते १५ किमी फेरा होणार कमी !

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नागपूर - मुंबई या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर बुलढाणा व चिखली भागातून मेहकर नजिक प्रवेश करण्यासह बाहेर पडण्याकरिता १० ते १५ किलोमीटरचा फेरा घ्यावा लागतो. त्यामुळे शॉर्टकट पोच रस्ता तयार करण्यासाठी अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी दोन पर्यायी रस्त्यांची अभ्यासपूर्ण मागणी नोंदवली होती. दरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडेही पाठपुरावा सुरू ठेवला. शासकीय यंत्रणेकडून याबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमरावती येथील मुख्य अभियंता यांना या संदर्भात स्थळ पाहणी करून आवश्यक तो अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

बुलढाणा व चिखली या भागातून समृद्धीकडे जाण्यासाठी चिखली ते मेहकर या राष्ट्रीय महामार्ग  ( ५४४ सी सी) वापर करतात. तर समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी हिवरा आश्रम, नागझरी, कल्याण फाटा व पुढे मेहकर गावातून जाऊन मेहकर ते मालेगाव रस्त्यावर वरून मेहकर - खामगाव असा राष्ट्रीय महामार्ग ( ५४८ सी) कडे जात या रस्त्यावरून समृद्धी महामार्गावर इंटरचेंज ( आयसी ११) पोचता येते. या रस्त्यावरून जावं लागत असताना अंदाजे १० ते १५ किलोमीटरचा फेरा पडतो आणि ३० ते ४० मिनिटांचा वेळ देखील शिल्लक जातो. 
या संदर्भात अमरावती पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी राज्य सरकारकडे पत्ररूपी पाठपुरावा करून नवीन पोच रस्त्याची मागणी करून पर्याय देखील सुचवला होता. यामध्ये मेहकर रोडवरील कल्याण फाटा येथून समृद्धी महामार्गावर प्रवेश करण्याकरता व बाहेर पडण्याकरिता नवीन मार्ग तयार करण्याची मागणी नोंदवण्यात आली होती. 
दरम्यान एमएसआरडीसी च्या वतीने दोन पर्यायासाठी सकारात्मक हालचाली सुरू करण्यात होत्या.पर्यायी दोन्ही रस्ते हे ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गाच्या दर्जाच्या असल्याने त्यांची दर्जाउन्नती करूनच पुढील काम करावे लागणार असल्याचा अहवाल एमएसआरडीसी ने सादर केला. त्यामुळे आमदार आमदार धीरज लिंगाडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे २९ एप्रिल २०२५ रोजी मागणी पत्र दिले. पुन्हा या संदर्भात मे महिन्यातही पाठपुरावा केला. मंत्री महोदयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला या संदर्भात सूचना केल्या. त्यानुसार कार्यासन अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमरावती येथील मुख्य अभियंता यांना मेहकर रोडवरील कल्याण फाटा येथून समृद्धी महामार्गावर पोहोचण्याच्या दृष्टीने पोच रस्ता तयार करण्यासाठी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अस्तित्वातील रस्ता लांबी, रुंदी व दर्जा उन्नतीसाठी आवश्यकतेनुसार नकाशे व कागदपत्रांच्या संदर्भातला अहवाल, ना हरकत प्रमाणपत्रासह तयार करून शासनाला सादर करण्याच्या सूचना ४ जून २०२५ रोजी लेखी स्वरुपात केल्या आहेत. बुलढाणा व चिखली भागातून समृद्धी महामार्गावर पोहोचणाऱ्यांसाठी हा नवीन मार्ग तयार झाल्यास मेहकर शहर वगळून अंदाजे १० ते १५ किलोमीटरचा फेरा कमी करता येऊ शकतो. त्यामुळे मेहकर शहराच्या मुख्य रस्त्यावरून वर्दळ रहदारीमुळे ३० ते ४० मिनिटांचा अधिकचा जाणारा अधिकचा वेळ देखील वाचता येऊ शकतो, हे विशेष!