इस लडकी से बचके रहना... प्यार का नाटक करती है और रेप केस मे फसाती है...; बनावट फेसबुक खाते उघडून विवाहितेची बदनामी!

 
पुणे : पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात एका ३१ वर्षीय विवाहितेने तक्रार केली आहे. तिची तक्रार ऐकून पोलीसही चक्रावून गेलेत. विवाहितेने ज्या तरुणाविरुद्ध आधी तक्रार दिली होती तो तरुण जामिनावर सुटल्यानंतर माझी सोशल मीडियावर बदनामी करत आहे. तुझा मुलगा माझा आहे... असे म्हणत त्याची मागणी करत आहे, असे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी समीर बाळू निकम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विवाहितेने याआधी सुद्धा समीरविरुद्ध तिने तक्रार दिली होती. त्या गुन्ह्यात समीरला अटक होऊन सध्या तो जामिनावर सुटला आहे. समीर विवाहिता राहत असलेल्या सोसायटीच्या खाली आला. त्याने तिच्यासोबत जबरदस्ती बोलण्याचा प्रयत्न केला. तुझा मुलगा राघव हा माझा मुलगा आहे. तो मला दे, नाहीतर मी कोणत्याही थराला जाईल... अशी धमकी समीरने विवाहितेला दिली. मात्र विवाहितेने दूर्लक्ष केले. त्यानंतर समीरने व्हाॅट्स अॅपवर स्टेटस ठेवून विवाहितेने आधी दिलेल्या तक्रारीशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर लिहिला.

"कमिंग सून माय न्यू साँग, उद्या बैल लावणार नांगरासगट, उद्या रात्री पोस्टर प्रदर्शित... पारंपरिक घरातील लोक स्वतःच्या बायको मुलीला कसे बाजारात आणतात हे गाण्यात आहे. माझे आयुष्य कसे उद्‌ध्वस्त झाले हे मी या गाण्यात मांडले आहे...' असा मजकूर समीरने स्टेटसला ठेवला होता. त्यानंतर एका मुलीच्या नावाने फेसबुकवर खोटे खाते उघडून समीरने त्यावर तक्रारदार विवाहितेचा फोटो टाकला. "इस लडकी से बचके रहना, प्यार का नाटक करके अच्छे अच्छे फोटो डालकर ये जाल मे फसाती हैं, ब्लॅकमेल करती हैं... नहीं तो रेप केस मे फसाती है, उसके माँ बाप, बहन सब साथ देते हैं, यकीन ना आये तो आजूबाजू पूछताछ करके देखना सावधान रहना...' असा मजकूर समीरने फेसबुकवर लिहिला. विवाहितेच्या नातेवाईकांना फोन करूनसुद्धा समीरने उलट सुलट सांगून बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विवाहितेच्या पतीला भेटून "ती' माझी आहे. मी तुमची इज्जत घालवणार. तुमच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करून तुम्हाला अडकवणार, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी समीरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.