State News : प्रेमाच्या आड येत होती… पतीने बाथरूम साफ करायचे लायझोल पाजले!; प्रेयसीनेही हॉस्पिटलमध्ये येऊन दिली धमकी!!
सोलापूर : प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीला बाथरूम साफ करायचे लायझोल लिक्विड पाजल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरमध्ये समोर आला आहे. विजापूर नाका पोलिसांनी पती राहुल राजाभाऊ उदार व त्याची प्रेयसी फरीदा शेख या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
स्नेहा राहुल उदार यांनी या प्रकरणात तक्रार दिली. ती पतीसह सैफुलनजीकच्या उद्भवनगरात राहते. तिचा पती राहुल आणि त्याची प्रेयसी फरीदा शेख यांच्यातील प्रेमाची माहिती तिला झाली. तिने विरोध सुरू केला. त्यामुळे संतापून पतीने तिचाच काटा काढण्याचा प्रयत्न केला. ३ ऑक्टोबरला त्याने स्नेहाला बाथरूमध्ये जबरदस्तीने घेऊन जात लायझोल पाजले. आमच्या प्रेमाबद्दल कोणास सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत तिला लायझोल पाजण्यात आल्याने स्नेहाने तक्रारीत म्हटले आहे. ४ ऑक्टोबरला स्नेहा अश्विनी रुग्णालयात उपचार घेत असताना प्रेयसी फरीदानेही तिथे येऊन तिला “तू माझ्या राहुलचे नाव कोठे घेऊ नको. घेशील तर तुला बघून घेईन, असे तिला धमकावले. या प्रकरणी १५ ऑक्टोबरला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले करीत आहेत.