State News ः स्मशानात १६ वर्षीय मुलीच्या मांडीवर कोंबडा ठेवून अघोरी पूजा!

सातारा : १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मांडीवर कोंबडा ठेवून स्मशानात तिची अघोरी पूजा करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील सुरुर (ता. वाई)येथे समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याआधारे पोलिसांनी शोध घेत पुण्यातील हडपसर भागातून मुलीच्या कुटूंबियांना ताब्यात घेतले; मात्र मांत्रिक फरारी आहे. २७ सप्टेंबरला सुरुर येथील स्मशानात हा …
 

सातारा : १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मांडीवर कोंबडा ठेवून स्मशानात तिची अघोरी पूजा करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील सुरुर (ता. वाई)येथे समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्‍याआधारे पोलिसांनी शोध घेत पुण्यातील हडपसर भागातून मुलीच्या कुटूंबियांना ताब्यात घेतले; मात्र मांत्रिक फरारी आहे.

२७ सप्टेंबरला सुरुर येथील स्मशानात हा अघोरी प्रकार सुरू होता. मृतदेह जाळण्यात येणाऱ्या ठिकाणी कुंकवाचे रिंगण करण्यात आले होते. रिंगणात मुलीला बसवण्यात आले. तिचे केस मोकळे सोडण्यात आले. मुलीच्या मांडीवर कोंबडा ठेवण्यात आला. तिच्यासमोर अंडे, निंबू, नारळ, सुपारी, बाहुल्या असे साहित्य ठेवून मांत्रिक जोरजोरात मंत्र म्हणत होता. गावकऱ्यांना हा प्रकार कळताच त्‍यांनी गर्दी केली. काही लोकांनी व्हिडिओचे चित्रण केले. गावकऱ्यांनी मांत्रिकाला विचारल्यावर तिला भुताने झपाटले आहे.

बाहेरचे लागले आहे. ते बरे करणे सुरू आहे, असे उत्तर मांत्रिकाने दिले. मात्र लोकांची जास्त गर्दी होत असल्याचे दिसताच मांत्रिक मुलीला व मुलीच्या नातेवाइकांना घेऊन पसार झाला. नागरिकांनी कारचा क्रमांक पोलिसांना दिला. त्यावरून मुलगी हडपसरची असल्याचे पोलिसांना कळाले. हडपसर येथून मुलीच्या कुटूंबियांना ताब्यात घेण्यात आले. हा नरबळीचा प्रकार तर नव्‍हता यादृष्टीने तपास पोलीस करत आहेत.