STATE NEWS ६०० गाड्यांचा ताफा घेऊन बीआरएसचे के.चंद्रशेखर राव महाराष्ट्रात! उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत, फक्त राजकारण बाजूला ठेवून या..

 
मुंबई( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): महाराष्ट्रात नव्याने एंट्री करणाऱ्या बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आता विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्रात आले आहे. त्यांच्या सोबतीला तब्बल ६०० गाड्यांचा ताफा आहे. यात त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री, पक्षाचे नेते यांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांनी के.चंद्रशेखर राव यांना कडेकोट सुरक्षा पुरवली आहे.
 

 महाराष्ट्रात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका आहेत, त्याआधी लोकसभा निवडणुका देखील होणार आहेत. यामुळे के.चंद्रशेखर राव महाराष्ट्रात त्यांचा पक्ष मजबूत करण्याच्या इराद्याने उतरले आहेत. त्यासाठीचा प्रचार देखील त्यांनी सुरू केला असून महाराष्ट्रात प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात आता बीआरएस चे पोष्टर झळकू लागले आहेत. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात प्राबल्य असलेला हा पक्ष आता पंढरपुरच्या यात्रेकडेही पक्षविस्ताराच्या भूमिकेतून पहात आहे.त्यामुळे ६०० गाड्यांचा ताफा, अख्खे मंत्रिमंडळ घेऊन बीआरएस शक्तीप्रदर्शन  करीत आहे. याआधी बीआरएसने मराठवाडा आणि विदर्भात सभा घेतल्या आहेत. शिवाय नागपूरात पक्षाचे मुख्य कार्यालय देखील उभारण्यात आले आहे. पुढील काळात पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईत देखील पक्षाचे कार्यालय उभारण्याचा बीआरएस चा मानस आहे.

राजकारण बाजूला ठेवून या, स्वागत आहे..!

  दरम्यान के चंद्रशेखर राव यांच्या या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "वारी मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचे स्वागतच आहे, फक्त येताना राजकारण बाजूला ठेवून यावे" असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी " विठ्ठलाचा दरवाजा सगळ्यांसाठी खुला आहे, भक्ती करण्यापासून कुणाला रोखता येत नाही" असे म्हटले आहे.