STATE NEWS 'मुंबईसह राज्यातून होणारा हिरे व्यापार 97 टक्क्यांवर पोहोचला, मुंबईसमोर सूरतही मागे पडले'! 

मुंबईचा हिरे व्यापार सुरतला जाण्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना सणसणीत उत्तर; उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मुंबईतल्या हिरे निर्यातीत झाली होती मोठी घट
 
मुंबई (लाइव्ह ग्रुप नेटवर्क): गुजरातमधल्या सूरत इथे नुकत्याच खुल्या झालेल्या सूरत डायमंड बोर्सच्या पार्श्वभूमीवर मुंबईतला हिरे व्यापार गुजरातला जाण्याच्या चर्चांना जोर आला आहे. मात्र, विरोधकांनी उठवलेल्या या आवईला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी आणि पुराव्यांनिशी सडेतोड उत्तर दिले आहे. उलट कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात हिरे व्यापार मुंबईतल्या भारत डायमंड बोर्सला निर्यात परवानगी नाकारल्याने तेव्हाची मुंबईची निर्यात घटून 94% झाली होती. गेल्या दिड वर्षांत ही निर्यात पुन्हा सुरू झाल्याने 97% झाली असून त्यात सूरतही मागे पडल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. 
मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून भरभराटीला आलेला हिरे व्यापार सूरत डायमंड बोर्सच्या उद्धाटनानंतर गुजरातला जाणार असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी देखील मुंबईतील हिरे व्यापार गुजरातला हलवण्यात येणार असल्याची ओरड केली आहे. मात्र, या टीकेतला फोलपणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच विधानसभेत केला. यावेळी त्यांनी गेल्या 3 वर्षांतली आकडेवारी सादर करत आधीच्या सरकारची हिरे व्यापाराबद्दलची धोरणं उघडी पाडली.
 
आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात हिरे निर्यात घटली
विधानसभेत आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुंबईतील हिरे व्यापाराबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, "कोरोनाच्या काळात मुंबईतलं भारत डायमंड बोर्स सातत्याने तत्कालिन राज्य सरकारला म्हणत होतं की, आम्हाला निर्यात करण्यासाठी परवानगी द्या. तेव्हा राज्य सरकारने ती निर्यातीची परवानगी दिली नाही. मी तत्कालिन मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की त्यांना परवानगी द्या, पण तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलं नाही. परिणामस्वरूप मुंबईतून होणारी हिरे निर्यात 94 टक्क्यांपर्यंत खाली घसरली आणि सूरतची हिरे व्यापाराची निर्यात 2 टक्क्यांवरून थेट 7 टक्क्यांवर जाऊन पोहोचली. मात्र, महाराष्ट्र आणि मुंबईची खरी ताकद ही आहे की, 2022-23 आणि 2023-24 या आतापर्यंतच्या काळात आपली हिरे निर्यात वाढून 97% झाली तर सूरतची 2.57% खाली आली आहे. याचा अर्थ मुंबईची निर्यात वाढून सूरतची घटली आहे. सध्या सर्वत्र उद्योगधंदे वाढत असल्याने इतर राज्यही त्यांचा उद्योग वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. पण, मुंबई ही मुंबई आहे. मुंबईचा हिरे व्यापार सूरतला कधीच जाणार नाही."
मुंबईत हिरे उद्योगात 1700 कोटींची गुंतवणूक होणार
दरम्यान, मुंबईतून एकही हिरा उद्योग सूरतला जाणार नसल्याचं मुंबई हिरे व्यापारी संघाने स्पष्ट केलंय. त्यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या माहितीला दुजोरा देत हिरे व्यापार मुंबईतच राहणार असल्याचं म्हंटलंय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या प्रयत्नाने मुंबईची हिरा निर्यात 97% ने वाढली आहे. यु.ए.ईसोबत झालेल्या करारानुसार मुंबईत सुद्धा मोठा उत्पादन प्रकल्प उभारला जाणार आहे. मलबार गोल्ड कंपनीचे मुंबईत मुख्यालय उभारलं जाणार आहे. यामार्फत मुंबईतल्या हिरे उद्योगात 1700 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. त्याचबरोबर तुर्की डायमंड, तनिष्क हे देखील गुंतवणूक करणार असल्याची माहिती हिरे व्यापारी संघाने दिली आहे.
नवी मुंबईत ज्वेलरी पार्कचे काम सुरू
हिरे उद्योग गुजरातमध्ये स्थलांतर होत असल्याच्या चर्चेत सत्यता नसून उलट देशातील सर्वात मोठे एकात्मिक ज्वेलरी पार्क नवी मुंबईत उभे राहत आहे. वांद्रे- कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स तसेच जेम्स अँड ज्वेलरी निर्यात आणि प्रबंधन कौन्सिलच्या (जीजेईपीसी) कार्यालय या कामात लक्ष घालत आहेत. याबद्दल माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, "त्यांना उद्योग वाढीसाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्या राज्य शासन उपलब्ध करून देत आहे. नवी मुंबईत महापे येथे देशातील सर्वात मोठे ज्वेलरी पार्क उभे राहत आहे. त्याठिकाणी किमान एक लाखाहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यात इतर ठिकाणी व्यवसाय विस्ताराची भूमिका उद्योजकांनी मांडली आहे. निश्चितपणे त्यांना त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल." दरम्यान, याबद्दलचे धोरण लवकरच जाहीर करणार असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.