हादरवून टाकणारी बातमी... अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या चिमुरड्याची आईनेच केली हत्या!
सांगली : अनैतिक संबंधात अडसर ठरतो म्हणून आईनेच स्वतःच्या साडेतीन वर्षीय मुलाचा प्रियकराच्या मदतीने खून केला. ही धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात समोर आली आहे. मनन सुशांत वाजे असे हत्या झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी महिलेचा पती सुशांत सुधीर वाजे (रा. माळभाग, वाळवा) यांनी १६ डिसेंबर रोजी आष्टा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी प्राची सुशांत वाजे आणि तिचा प्रियकर अमरसिंह विश्वासराव पाटील (रा. बिळाशी, ता. शिराळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मननचे वडील सुशांत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना त्यांची पत्नी प्राची हिचे अमरसिंह याच्याशी अनैतिक संबंध असल्याची शंका होती. २७ जून २०२१ रोजी प्राची घरात कुणाला काहीही न सांगता मननला सोबत घेऊन गेली होती. प्राची तिचा प्रियकर अमरसिंह पाटील याच्या मुंबईतील घरी असल्याचे सुशांत यांना कळले होते. त्यानंतर अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने प्राची आणि तिच्या प्रियकराने मननचा छळ सुरू केला. मननचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावली.
मननचा मृत्यू मुंबईत झाला असताना अमरसिंह आणि प्राची यांनी मननचा मृत्यू बिळाशी येथेच झाल्याची खोटी माहिती बिळाशी येथील ग्रामसेवकांना प्रतिज्ञापत्र देऊन दिली. त्यानंतर प्राची आणि तिचा प्रियकर पुन्हा मुंबईत राहू लागले. सुशांत यांना एका निनावी पत्राद्वारे या घटनाक्रमाची माहिती मिळाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. आष्टा पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या शोधासाठी पथके गठीत केली आहेत. आता या विकृत महिलेला आणि तिच्या प्रियकराला लवकरच बेड्या ठोकण्यात येणार आहेत.