धुळ्याच्या आनंदखेडेत सेक्स रॅकेट?; सायबर कॅफेच्या आड गोरखधंदा; पत्नीनेच फोडले पतीचे बिंग!
सध्या माहेरी नगाव बारी देवपूर (जि. धुळे) येथे राहणाऱ्या २५ वर्षीय विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तिचा विवाह १८ मे २०२० रोजी आनंदखेडे येथे झाला होता. लग्नाच्या काही दिवसांत पतीने तिला तिच्याशी इच्छा नसताना लग्न झाल्याचे सांगितले होते. त्याचे गावातीलच एका मुलीवर प्रेम असून, आम्ही लग्न करणार होतो, असे त्याने तिला सांगितले. त्या मुलीनेही विवाहितेला फोन करून प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळे धक्का बसलेल्या विवाहितेने माहेर गाठले.
यामुळे दोन्ही कुटुंबात मोठा तणाव निर्माण झाल्याने त्या मुलीचे आई-वडील मुलीसह विवाहितेच्या माहेरी आले आणि गंमत म्हणून फोन केल्याचे सांगितले. त्यानंतर ती पुन्हा नांदायला गेली. तिच्या पतीचा गावात सायबर कॅफे आणि जनरल स्टोअर्स आहे. पतीच्या हालचाली अत्यंत संशयास्पद होत्या. तो तिला दुकानात बसू देत नव्हता. कॉम्प्युटरला हात लावू देत नव्हता. त्यामुळे शंका आल्याने तिने अधिक लक्ष ठेवले असता पतीचा गोरखधंदाच तिच्या समोर आला.
तिच्या हाती काही अश्लील चित्रफिती आणि पेनड्राइव्ह लागला. अश्लील चित्रफिती बनवून तिचा पती विकतो. सोशल मीडियावर आधी मुलींशी ओळख निर्माण करतो. नंतर त्यांच्याशी मैत्री करून नग्न फोटोंचे स्क्रिनशॉट काढून त्याआधारे शरीरसुखाची मागणी करून ब्लॅकमेल करतो. सायबर कॅफेवर येणाऱ्या मुला-मुलींच्या फोटोंचा गैरवापर करतो. त्याआधारे अश्लील फोटो तयार करतो. पती सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोपही पत्नीने पोलिसांत केलेल्या तक्रारीत केला आहे.
तिने याबद्दल पतीला जाब विचारला असता तिला जीवे मारण्याची धमकी दिली, असे पत्नीने तक्रारीत म्हटले आहे. आपलेही अशाच पद्धतीने अश्लील फोटो पतीने तयार केले असल्याचा संशय तिला आहे. पतीच्या कॉम्प्युटरमध्ये पूजा, वैष्णवी, सपना, जानु या नावाने फोल्डर असून, त्यात असंख्य मुलींचे असंख्य फोटो आहेत. त्याचेही बऱ्याच मुलींसोबत फोटो आहेत, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी ३० वर्षीय पती व त्याला साथ देणाऱ्या ५५ वर्षीय सासरा, ५० वर्षीय सासू, २६ वर्षीय नणंद, ३० वर्षीय नंदोई यांच्या चुलत सासरे, चुलत आजोबा, मामेसासरे अशा एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.