संजय राऊतांचे भाजपाला आव्हान!; म्हणाले, लढण्या-मरण्यासाठी तयार!!
Jan 25, 2022, 12:12 IST
मुंबई ः ड्युप्लिकेट, ढोंग, नकली आहे त्याचं हिंदुत्व. सत्तेसाठी त्यांना हिंदुत्व आठवतं. पाकिस्तान, हिंदू- मुस्लमान हे विषय तेवढ्यासाठीच चर्चेत आणले जातात. काम झालं की त्यांना फेकून दिलं जातं. राजकारणामधील गरज पूर्ण झाली हिंदूंना दूर लोटायचं ही त्यांची पद्धत आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही काल असेच म्हणाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रासोबत लढण्यास शिवसेना तयार असल्याचे थेट आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
गोव्यातील लक्ष्मीकांत पार्सेकर, मनोहर पर्रीकरांचा मुलगा, महाराष्ट्रात एकनाथ खडसे, मुंडे कुटुंब, रामविलास पासवान यांच्या कुटुंबाचं भाजपाने काय केलं हे देशाने पाहिले आहे. आमचा आत्मविश्वासच आम्हाला पुढे घेऊन चालला असून, आम्हाला टक्कर दिली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही राऊत यांनी भाजपाला दिला.
ईडी, सीबीआय असो किंवा केंद्रातील सत्ता... आम्हाला चिरडण्याचा प्रयत्न केलात तरी आम्ही घाबरणार नाही. लढण्यासाठी आणि मरण्यासाठी तयार आहोत. तुम्हाला हवं ते करा, असे आव्हानही राऊत यांनी दिले. शिवसेनेची पावलं दिल्लीच्या दिशेने पडत असल्याचेही ते म्हणाले. प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणुका लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.