रावण ५ कोटी, परमवीर अडीच कोटी, वारीस दीड कोटी... सारंगखेड्याच्या यात्रेत घोड्यांच्या किंमतीची कोटी कोटी उड्डाणे!

 
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्याच्या यात्रेतील घोडेबाजार देशभरात प्रसिद्ध आहे. बऱ्याचदा निवडणुकांमध्ये मतांचा घोडेबाजार असा शब्दप्रयोग करण्यात येतो. अर्थात हा शब्दप्रयोग कसा उचित आहे याचे उत्तर तुम्हाला सारंगखेड्यातील हा घोड्यांचा बाजार पाहिल्यावर नक्कीच येईल. या यात्रेत एकेका घोड्यावर तब्बल दीड ते अडीच कोटींची बोली लावली गेली. विशेष म्हणजे एवढा भाव मिळूनही काही व्यापाऱ्यांनी घोडे विकले नाहीत. सध्या ही यात्रा सुरू आहे. दत्तजयंती निमित्त भरणारी ही यात्रा महिनाभर चालते.

एक रावण नावाचा घोडा तब्बल ५ कोटी रुपयांना मागितल्याचा दावा घोड्याच्या मालकाने केला आहे. अडीच कोटींचा परमवीर, दीड कोटी रुपयांचा वारीस, दीड कोटी रुपयांचा अलेक्स आणि बुलंद नावाचा घोडासुद्धा लक्ष वेधून घेत आहेत. या घोड्यांना कोट्यवधी रुपयांची किंमत मिळूनही मालक विकायला तयार नाहीत. कारण अश्वसंवर्धन केंद्रात या घोड्यांचा वापर प्रजननासाठी होतो.

मागील वर्षी कोरोनामुळे यात्रा भरली नव्हती. मात्र यंदा प्रशासनाने नियम व अटींची मर्यादा घालून या यात्रेला परवानगी दिली. दरवर्षी देशभरातून ३ हजार घोडे या यात्रेत दाखल होत असतात. यंदा मात्र जवळपास दीड हजार घोडे बाजारात दाखल झाले आहेत. ५० हजार रुपयांपासून तर ५ कोटी रुपयांपर्यंत या बाजारात घोडे उपलब्ध आहेत. केवळ ७ दिवसांत ४०० घोड्यांच्या विक्रीतून दोन कोटी रुपयांची उलाढाल या बाजारात झाली आहे.