खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक संपन्न!
पीक कर्ज वितरण वेगाने करण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश! १ लाख ५६ हजार ४०० शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे टार्गेट.....

 
 बुलडाण(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असताना, पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज वेगाने मिळावे, यासाठी सर्व बँकांनी सक्रिय भूमिका घ्यावी, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी आज दिले.
 
नियोजन भवन येथे खरीप हंगाम पूर्व नियोजन २०२५-२६ चा आढावा पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव, विधान परिषद आमदार किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, विधानसभा आमदार चैनसुख संचेती, संजय गायकवाड, मनोज कायंदे, सिद्धार्थ खरात, श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, आगामी काही दिवसात मान्सून सक्रिय होणार असून खरीप हंगामाचे कामे सुरु होईल. त्यामुळे जिल्ह्यात खते, बियाणे यांची मुबलक उपलब्धता ठेवून शेतकऱ्यांसाठी अतिशय सूक्ष्म नियोजन करावे. तसेच बोगस बियाणे विक्री होणार नाही यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये १ लाख ५६ हजार ४०० शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र आजअखेर फक्त ११० कोटी २४ लाख रुपयांचेच पीक कर्ज वितरित झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज केलेल्या कर्ज प्रकरणांना त्वरीत मंजुरी देऊन निधी वितरित करावा. कोणताही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व बँकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश यावेळी दिले. 
शेतकऱ्यांनी पारपांरिक पिकावर अवलंबून न राहता फळबाग लागवड, भाजीपाला,बिजउत्पादन अशा पिकांना प्राधान्य द्यावे. विशेषत: कमी पाण्यामध्ये येणाऱ्या पिकांना प्राधान्य शेतकऱ्यांनी द्यावे. यासाठी कृषि विभागाने शेतकऱ्यामध्ये जनजागृती करावी. तसेच शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी व ॲग्रीस्टकची नोंदणी करणे बंधनकारक असून शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.  
जिल्ह्यात ७ लाख ४१ हजार ३५७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्याचे नियोजन असून त्यापैकी ५८ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेतले जाणार आहे. सोयाबीनसाठी १ लाख ११ हजार ४९७ क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून शेतकरी मोठ्या प्रमाणात घरचे बियाणे वापरत असल्याने बियाण्याची उपलब्धता समाधानकारक आहे. तसेच कापूस हे दुसऱ्या क्रमांकाचे मुख्य पीक असून २५ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड होणार आहे. त्यासाठी ९ लाख ३९ हजार ९५५ बियाणे पाकिटांची आवश्यकता असून आजअखेर २ लाख २६ हजार ६६० बियाणे पाकिटे उपलब्ध झाली आहेत. लवकरच उर्वरित बियाण्याही उपलब्ध होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. तूर, मुग, उडीद, मका, ज्वारी आदी पिकांची लागवड १ लाख २८ हजार ६१२ हेक्टर क्षेत्रावर होणार असून त्यासाठीही बियाण्याचा पुरेसा साठा असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. ढगे यांनी दिली. 
खरीप हंगामासाठी १ लाख ७१ हजार ६०० मेट्रिक टन खताची मागणी असून, १ लाख ८५ हजार ४८७ मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झाले आहे. सध्या ९९ हजार ७४८ मेट्रिक टन खत जिल्ह्यात उपलब्ध असून, टंचाई भासणार नसल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी जमिन आरोग्य पत्रिकेचा वापर करून संतुलित खत मात्रा वापरावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
खरीप हंगाम यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्ह्यात १४ भरारी पथके, नियंत्रण कक्ष तसेच तक्रार निवारण समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. याशिवाय, जून २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत अतिवृष्टी, गारपीट, वादळ यामुळे जिल्ह्यात ३ लाख १६ हजार ५८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, ३ लाख ७४ हजार ४२० शेतकऱ्यांना एकूण ३४४ कोटी २० लाख रुपयांची नुकसानभरपाई वितरित करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.