मुंबई पोलिसांच्या भीतीने लपून बसले परमबीर!
४८ तासांत हजर होणार
Nov 22, 2021, 15:21 IST
मुंबई (कव्हरेज गुरू वृत्तसेवा) ः मुंबई पोलिसांपासून धोका असल्याने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह लपून बसले असून, ते भारतातच आहेत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीत परमबीर सिंह यांना मुंबई पोलिसांना अटक न करण्याचे आदेश देत चौकशीसाठी ४८ तासांत सीबीआय अधिकाऱ्यांसमोर हजर होण्याचे आदेश दिले.
सिंह यांच्या याचिकेवर आज, २२ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सिंह यांच्या जीवाला धोका असल्याने ते अज्ञातस्थळी असल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. सिंह यांना फरारी होण्याची इच्छा नाही. केवळ अटकच नाही तर जीवाचाही धोका असल्याचे सिंह यांच्या वतीने सांगण्यात आले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्तच मुंबई पोलिसांपासून धोका असल्याचे म्हणत असतील तर समाजात किती वाईट संदेश जातो?, असा प्रश्न न्यायमूर्ती एस. के. कौल यांनी विचारला. सिंह यांनी संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर न्यायालयाने सिंह यांना दिलासा देत अटकेपासून संरक्षण प्रदान केले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे सिंह यांना अडकवले जात असल्याचे न्यायालयात वकिलांनी सांगितले. सिंह यांनी देशमुख यांच्यावर वसुली रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला होता.