एकदा प्रियकरासोबत पळून गेली... तिला माफी मिळाली... दुसऱ्यांदा प्रियकर पुन्हा घ्यायला आला...मग घडले हे कांड!
अमरावती (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेलेल्या तरुण विवाहितेला परत आणल्यानंतर पुन्हा प्रियकर तिला घ्यायला आला... पण यावेळी "भानावर' आलेल्या विवाहितेने त्याच्यासोबत पळून जाण्यास नकार दिला. तू आली नाही तर मी मरतो असा मेसेज केला. त्यावर विवाहितेने मी नाही येत...मीच मरते, असे म्हणत गळफास घेतला... ही धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील खोलापूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कापूसतळणी येथे समोर आली आहे.
ऋतिका अविनाश दखने (२५, रा. कापूसतळणी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. गावातीलच विक्रम अरुण मेश्राम याच्यासोबत तिचे आधी अफेअर होते. विक्रमविरुद्ध विवाहितेचा पती अविनाशने खोलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अविनाशचे लग्न ऋतिकासोबत २०१६ मध्ये झाले होते. तो इंडोतिबेटियन बॉर्डर पोलीसमध्ये कॉन्स्टेबल पदावर शिवपुरी (मध्यप्रदेश) येथे नोकरीला होता. मार्च २०१९ मध्ये ऋतिका बेपत्ता झाली हाती. पोलिसांनी ८ दिवसांत मोबाइल लोकेशनवरून शोध घेत तिला पुण्यातून विक्रम मेश्राम या तरुणासोबत ताब्यात घेतले होते. त्यावेळी मी पुन्हा अशी चूक करणार नाही. मला पदरात घ्या... अशी विनवणी केल्याने तिला पती व सासरच्यांनी स्वीकारले होते. त्यानंतर अविनाश तिला घेऊन ड्युटीच्या ठिकाणी राहायला गेला होता.
दरम्यान दिवाळीच्या सुटीत दोघे पती- पत्नी मुलासह गावी आले होते. १० डिसेंबर रोजी अविनाश शेतात काम करत असताना पत्नी ऋतिकाने राहत्या घरात गळफास घेतल्याचा निरोप मिळताच तो धावत घरी पोहोचला. पत्नीला तातडीने फासावरून काढून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अंत्यविधी आटोपल्यानंतर अविनाशने ऋतिकाचा मोबाइल तपासला असता त्यात 7875232668 हा नंबर Di या नावाने सेव्ह होता. त्यावरून व्हाॅट्स ॲपला "तू बाहेर ये. मला तुला बघायचं आहे. तुझे माझ्यावर प्रेम नाही का? माझ्यावर केस लागली तरी चालेल... तू आली नाहीतर मी मरतो' असे मेसेज होते. त्यावर रिप्लाय म्हणून ऋतिकाने "तू येथून जा. मी नाही येत. मी मरते...' असे मेसेज पाठवलेले दिसले. अविनाशने तो नंबर तपासला असता तो गावातीलच विक्रमचा असल्याचे कळले. त्यानंतर अविनाशने पोलीस ठाण्यात जाऊन विक्रमनेच पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केले, अशी तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी विक्रमविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.