मोताळा भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याची महिलेसोबत अरेरावी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, शिस्तभंगाची कारवाई होणार.....
Jul 3, 2025, 18:37 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोताळा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका अधिकाऱ्याचा महिलेसोबत अरेरावी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती उपअधीक्षक विजय सवडतकर यांनी दिली आहे.
जमिनीच्या मोजणीसाठी रवींद्र मोरे या शेतकऱ्याने वर्षभरापूर्वी अर्ज केला होता. मात्र, इतक्या कालावधीनंतरही मोजणी न झाल्याने त्यांनी पत्नीसमवेत भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन अधिकाऱ्याकडे विचारणा केली. त्यावेळी कार्यालयातील जाधव नावाच्या अधिकाऱ्याने मोरे दांपत्याशी उद्धटपणे आणि अरेरावीने वागणूक दिली, असा प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकाराचा व्हिडीओ नागरिकांनी सोशल मीडियावर अपलोड केल्याने यास अधिक वाचा मिळाली आहे.
या प्रकरणामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयात सन्मानाने वागणूक मिळावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
या घटनेबाबत भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक विजय सवडतकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सदर अधिकाऱ्याच्या वर्तणुकीची गंभीर दखल घेतली असून त्याच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. तसेच तक्रारदार रवींद्र मोरे यांची जमीन येत्या ९ जुलै रोजी मोजून प्रत प्रदान करण्यात येईल.या घटनेनंतर संबंधित कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, अशा प्रकारांवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.