अल्पवयीन मुलीवर शेजारील तरुणाचा लैंगिक अत्याचार; मोबाइल नंबर मिळवून केली होती ओळख!
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कुटुंबीयांसोबत पुण्यातील नऱ्हे परिसरातील एका कॉलनीत राहते. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणासाठी मुलीच्या वडिलांनी तिला स्मार्टफोन घेऊन दिला होता. घराशेजारी राहणाऱ्या रामेश्वरने तिचा नंबर मिळवला. दोघांचे त्यावरून बोलणे सुरू झाले.
रामेश्वरने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तो तिच्या घरी अधूनमधून येत होता. दरम्यान, सप्टेंबरमध्ये तिचे आई- वडील घरी नसताना तो दुपारी तिच्या घरी आला. तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर घडला प्रकार कुणाला सांगू नको.
सांगितल्यास तुझ्या आई- वडिलांना जीवे मारेन, अशी धमकी दिली. त्यानंतर तो सतत ब्लॅकमेल करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. अखेर रामेश्वरचा त्रास सहनशीलतेच्या पलीकडे गेल्यानंतर तिने वडिलांना याबाबत सांगितले. वडिलांनी तिला सोबत घेऊन सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी रामेश्वरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.