नगर जिल्हा रुग्णालय आग दुर्घटना ः "ही' कारणे आली समोर! ः
अहमदनगर ः अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला (आयसीयू) ६ नोव्हेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाला. ते बहुतांश वृद्ध आणि व्हेंटीलेटरवर होते. त्यांना हलवले जात असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, ही घटना कशामुळे घडली हे आता समोर येत असून, महापालिकेच्या अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी रुग्णालयाचे ऑडिट करून अहवाल दिला होता. त्यात आयसीयूमधील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकून त्यावर तातडीने उपाययोजना सूचवल्या होत्या. या उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठ्या दुर्घटनेची भीतीही या अहवालच व्यक्त केली होती. मात्र जिल्हा रुग्णालय प्रशासनाने हलगर्जीपणा केला आणि ही बाब ११ रुग्णांच्या जिवावर बेतल्याचे समोर येत आहे.
आग लागली तेव्हा आयसीयूमध्ये १७ रुग्ण उपचार घेत होते. आयसीयूतील एसीला आग लागली. बचावकार्य करताना ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे आणि आगीमुळे गुदमरून काही जणांचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. अग्निशमन दलाची वाहने अवघ्या काही वेळातच घटनास्थळी आली आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पण तोपर्यंत आयसीयू पूर्णपणे जळून नष्ट झाले होते. रुग्णालयाचे कर्मचारी, डॉक्टरांनी रुग्णांना वाचविण्यासाठी धावपळ केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. आयसीयूमध्ये स्थायी अग्निशमन यंत्रणाच उपलब्ध नसल्याने महापालिकेच्या अहवालातून समोर अाले आहे. फायर अलार्म, स्प्रिकंलर, पाण्याचे पंप या ठिकाणी नव्हते. आयसीयूमध्ये विजेच्या तारांची गुंतागुंत होती. त्यामुळेच शॉर्टसर्किट झाल्याची शक्यता आहे. आग लागल्यानंतर ऑक्सिजनच्या पाइपने पेट घेऊन आग भडकली असावी. त्यानंतर ती अाटोक्यात आणण्यासाठी यंत्रणाच नसल्याने अवघे आयसीयू आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले असावे. या ठिकाणी पीओपी केलेले आहे. एकच दरवाजा असल्याने बचाव कार्यातही अडचणी आल्या.
शिवसेनेकडूनही या गंभीर बाबी उघड...
शिवसेनेने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना दुर्घटनेला जबाबदार धरले आहे. पोखरणा यांच्या निष्काळजीपणा व हेकेखोर वृत्तीमुळे आग लागल्याचा आरोप उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केला आहे. शिवसेनेने केलेले आरोप....
- आयसीयूमधील सदोष वीज जोडण्यांबद्दल बांधकाम विभागाचे वीज तांत्रिक अभियंता जगदीश काळे यांनी दोन महिन्यांपूर्वीच डॉ. पोखरणा यांना पत्र दिले होते.
- अतिदक्षता विभागात बांधकाम अपूर्ण होते. महापालिकेने पूर्णत्वाचा दाखलाही दिला नव्हता. तरीही तेथे आयसीयूसारखा महत्त्वाचा विभाग सुरू केला.
- एसी व ऑक्सिजनचे सोबत गेलेले आहेत. पाइपवर कमी तापमानामुळे बर्फ साठतो. तो वितळून पाणी वायरिंगवर पडते. त्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका होता.
- शॉर्ट सर्किट होऊन वारंवार वीजपुरवठा खंडीत होत होता.
मुख्यमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश, आरोग्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकारी करणार आहेत. त्यांना आठवडाभरात अहवाल देण्याचे निर्देश आहेत.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी स्वत:च फिर्याद देत अज्ञात व्यक्तींविरूद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद केला आहे. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहेत. राज्य सरकारने चौकशी समिती नेमली असली तरी पोलिस स्वतंत्रपणे तपास करणार आहेत. एसपींच्या देखरेखीखाली तपासाच्या सूचना पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी दिल्या आहेत.