कंगणा राक्षसी प्रवृत्तीची, नीचपणाचा कळस गाठलाय...
शिवसेनेची टीका, काँग्रेस कायदेशीर कारवाई करणार!
Updated: Nov 17, 2021, 15:55 IST
मुंबई ः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या नव्या वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे. महात्मा गांधींकडून सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना पाठिंबा मिळाला नाही. दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते, स्वातंत्र्य नाही असे शरसंधान कंगणाने साधले होते. गांधींना सत्तेची भूक होती, असा दावाही कंगणाने केली आहे. काँग्रेसने कंगणाविरोधात कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला असतानाच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगणावर केलेल्या टीकेची चर्चा होत आहे. कंगणा राक्षसी वृत्तीची बाई असून, एकावर एक नीचपणाचा कळस करतेय. सकाळी सकाळी या बाईचं नाव घेऊ नका, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.
भगतसिंग किंवा नेताजींना महात्मा गाधींनी कधीच पाठिंबा दिला नाही. काही पुरावे असेही दर्शवतात की भगतसिंग यांना फाशी व्हावी ही गांधींची इच्छा होती. त्यामुळे तुमचा हिरो योग्यपणे निवडला पाहिजे, असा सल्लाही कंगणाने दिला आहे. कंगणाच्या वक्तव्याचे समर्थन करणारेही अनेक जण पुढे आले आहे. अनेकांनी सपोर्ट कंगणा नावाने मोहीमही सुरू केली आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि काँग्रेस मित्र असलेल्या पक्षांनी कंगणाविरोधात मोहीम उघडली आहे. महाराष्ट्र काँग्रेसनं कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. काँग्रेस तिच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे अधिकृत तक्रार नोंदवणार असल्याचेही पटोलेंनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.