गोष्ट कायद्याची! “ममता बॅनर्जींनी राजीनामा दिला नाही तर काय होईल?” — ममता बॅनर्जींच्या भूमिकेवर घटनात्मक पेच; पुढे काय होऊ शकतं?...कायदा काय सांगतो? जाणून घ्या..
May 6, 2026, 16:19 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ममता बॅनर्जी यांनी पराभवानंतरही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा न देण्याची भूमिका घेतल्याने पश्चिम बंगाल मध्ये मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. बहुमत गमावूनही पदावर राहण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे आता राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
कायदा काय सांगतो?
भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्याही मुख्यमंत्र्याला पदावर कायम राहण्यासाठी विधानसभेतील बहुमत आवश्यक असते. सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ दीपक नारगोलकर यांच्या मते, स्पष्ट बहुमत दुसऱ्या पक्षाला मिळाल्यास विद्यमान मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणे ही स्थापित घटनात्मक परंपरा आहे.
तसेच लोकप्रतिनिधी कायदा १९५१ अंतर्गत निवडणूक निकालाला न्यायालयात आव्हान देता येते, मात्र त्यासाठी ठोस पुरावे आवश्यक असतात.
राज्यपालांचा अधिकार काय?
जर मुख्यमंत्री बहुमत सिद्ध करू शकले नाहीत, तर राज्यपालांना विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल आर. एन. रवी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
मुदत संपली तर काय होईल?
१७व्या बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ७ मे २०२६ रोजी संपणार आहे. कायदेतज्ज्ञ विशाल गोसाई यांच्या मते,
* कार्यकाळ संपल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री आपोआप पदावर राहू शकत नाहीत
* ८ मे रोजी विधानसभा विसर्जित होण्याची शक्यता
* सर्व आमदारांचे सदस्यत्व रद्द होईल
* त्यानंतर नव्या सरकारची निवड बंधनकारक
“हा जनादेश नाही, कटकारस्थान!” — ममता यांचा आरोप
दरम्यान, पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी निकालावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप आणि निवडणूक आयोगावर टीका करत त्यांनी “हा जनादेश नसून कटकारस्थान आहे” असा दावा केला. “मी राजीनामा देणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
राजकीय चित्र बदलले
या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ने पहिल्यांदाच राज्यात सत्ता मिळवत तृणमूल काँग्रेस ला मोठा धक्का दिला आहे. १५ वर्षांची सत्ता गमावल्याने बंगालच्या राजकारणात मोठा बदल घडला आहे.
थोडक्यात राजीनामा न दिल्यास घटनात्मक मार्गाने राज्यपाल हस्तक्षेप करू शकतात, आणि विधानसभेचा कार्यकाळ संपताच ममता बॅनर्जी यांना पदावर राहण्याचा अधिकार उरत नाही.