असाही छंद असतो का? त्‍याचं घर भरलंय मोबाइलनी!; ३५०० मोबाइलचं कलेक्‍शन, लिम्का बुकमध्ये झाली नोंद
 

 
ठाणे : छंद जोपासण्यासाठी काही व्यक्ती काहीही करायला तयार होतात. ठाणे येथील जयेश काळे यांनी असाच एक हटके छंद जोपासलाय. मोबाइलचे कलेक्शन करायला त्यांना आवडतं. त्यांनी आतापर्यंत तब्बल ३५०० मोबाइलचे कलेक्शन करून ठेवले आहे. यासाठी त्यांची नुकतीच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.

भारतात सर्वाधिक मोबाइल फोन जमा करण्याची नोंद जयेश काळे यांच्या नावावर आहे. त्यांच्या या छंदाची सुरुवात होण्याचे कारणही मजेशीर असल्याचे ते सांगतात. २००३- २००४ मध्ये शाळेतील मित्रांसोबत जिन्यावरून खाली उतरताना त्यांचा नोकिया फोन खाली पडला. बॅटरी, कव्हर सर्व विखरले गेल्याने फोन खराब झाल्याचे त्यांना वाटले. मात्र त्यांचा तो पहिला फोन असल्याने फोनशी भावना जुळलेल्या होत्या.

बॅटरी आणि कव्हर लावून त्यांनी फोन चालू केला असता तो सुरू झाला. याचे त्यांना आश्चर्य वाटले. नवीन फोन विकत घेतल्यावरही त्यांनी जुना फोन विकला नाही. १० वर्षांत त्यांच्याकडे नोकियाचे बरेच फोन जमा झाले. सध्या जयेश यांचे घर म्हणजे जणू काही मोबाइलचे दुकानच झाले आहे. एवढे फोन असून एकही फोन न विकता आणखी खरेदी करण्यावर त्यांचा जोर असतो. घरातील कपाटात, बेडवर, कारमध्ये तसेच ऑफिसमधील दोन बॅगाही मोबाईलने भरल्याचे ते सांगतात. ३ हजार फोन झाल्यावर त्यांनी मोजणे बंद केले.

आता त्यांच्याजवळ जवळपास साडेतीन हजार फोन जमा झाले असून, त्यातील बहुतांश फोन चालू असल्याचेही त्यांनी सांगितले. आवडीनुसार दर आठवड्याला ते फोन बदलतात. ऑफिसात लहान फोन तर व्हिडिओ पहायचे असेल तर मोठा फोन ते वापरतात. त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे फोन असले तरी नोकिया ८९१० हा त्यांचा आवडता फोन आहे. हे फोन खरेदी करण्यासाठी त्यांनी २० लाख रुपयांचा खर्च केल्याचे ते सांगतात. सध्यातरी हे जमा केलेले फोन विकण्याचा विचार नाही. मात्र कुणी चांगली रक्कम देत असेल तर मी विचार करेन. मात्र फोन विकणे माझ्यासाठी अवघड आहे, असे जयेश काळे सांगतात.