जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेले... न्यायालयाने दया दाखवली!

 
नागपूर : सामान्यतः अपघात झाल्यानंतर अपघातास कारणीभूत असलेले वाहन किंवा वाहनचालक घटनास्थळावरून पसार होतात. त्यामुळे अशा प्रकरणात वेळेवर उपचार न मिळाल्यास अपघातात जखमी होणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होतो. अपघातास कारणीभूत वाहनचालकानेच जखमीला रुग्णालयात नेल्याची उदाहरणे खूप कमी पहायला मिळतात. मात्र वेळीच जखमीला रुग्णालयात नेले तर त्याचा जीव वाचू शकतो. जखमीला रुग्णालयात दाखल करण्याची माणुसकी दाखविणाऱ्याला त्याच्या कर्माची चांगले फळेही मिळतात. असाच अनुभव एका वाहनचालकाला आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने वाहनचालकाने त्या कठीण प्रसंगातही माणुसकी दाखवली म्हणून त्याचा कारावास कमी करून त्याच्यावर दया दाखवली आहे.
न्यायमूर्ती अविनाश नरोटे यांनी हा निकाल दिला आहे. प्रभाकर अस्तुरकर (४७, रा. चंद्रपूर) असे वाहनचालकाचे नाव आहे. ९ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रभाकर यांच्या वाहनाने एका दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर प्रभाकर पळून गेले नाहीत. त्यांनी अपघातातील जखमी दुचाकीस्वाराला रुग्णालयात दाखल केले. गडचिरोली न्यायालयाने प्रभाकरला एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर प्रभाकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा. अपघातानंतर त्यांनी जखमीला रुग्णालयात पोहोचवले व सामजिक कर्तव्याचे पालन केले हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे असे म्हणत न्यायालयाने त्याचा कारावास कमी केला.