मॅट्रिमनी साईटवरून ओळख, त्याने फेकले जाळे... मोहात अडकलेली महिला ६२ लाख गेल्यावर आली भानावर!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेहा सतप्रकाश पवार (३७, वाकड, मूळ रा. हरियाणा) हिची एका भामट्यासोबत मेट्रोमोनियल साईटवर ओळख झाली होती. मी यूकेमध्ये सिव्हील इंजिनियर आहे. तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे, असे त्याने नेहाला सांगितले. फोनवरून बोलणे, व्हॉटस् अॅप चॅटिंग, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्याने नेहाचा विश्वास संपादन केला. भारतात येऊन स्थायिक होणार असल्याचे त्याने नेहाला सांगितले.
नेहाच्या पत्त्यावर त्याने यूकेमधून लगेज पाठवले असल्याचे तिला सांगितले. एक महिला कस्टम अधिकारी आणि आरबीआय कर्मचारी म्हणून बोलणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून त्याने नेहाचा विश्वास संपादन केला. यूकेतून पाठवलेले सामान विमानतळावर पोहोचले आहे. ते सोडविण्यासाठी वेगवेगळे टॅक्स व प्रोसेसिंग फीच्या नावाखाली विविध बँक खात्यात नेहाने तब्बल ६१ लाख ९९ हजार ७६८ रुपये टाकले.
मात्र एवढे झाल्यानंतर जेव्हा समोरील व्यक्तीचा संपर्क तुटला तेव्हा फसवणूक झाल्याचे तिला कळाले. तिने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी नेहासोबत इंजिनिअर, कस्टम अधिकारी व आरबीआय कर्मचारी म्हणून बोलणाऱ्या +४४७५३७१०६८४९, +४४७५१३३३१६४७, ९८७०४१९१३३ मोबाइलक्रमांक धारक नतिश राजेश के व कस्टम अधिकारी म्हणून ९१८६०८४९७८१४ वर बोलणारी महिला व आरबीआय कर्मचारी म्हणून ६३८७९६०२१७ वर बोलणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.