शेतकऱ्यांनो, सोयाबीन पिकाकडे दुर्लक्ष करू नका! येलो–मोझॅकचा वाढतोय धोका; रोग दिसताच ‘हे’ करा, अन्यथा शेंगांचे मोठे नुकसान होऊ शकते...
पाने आकसली, लहान झाली तर सावधान!
मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीनची वाढ खुंटते. पाने आकसलेली, लहान, जाडसर आणि सुरकुतलेली दिसतात. परिणामी पिकावर शेंगांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होते.या रोगाचा प्रसार प्रामुख्याने खोडकिडीमार्फत तसेच दूषित बियाण्यांमधून होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखून तातडीने उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
पानांवर हिरवा-पिवळा रंग दिसतोय? मग पिवळा मोझॅकचा धोका!
पिवळा मोझॅक रोगामध्ये पानांचा काही भाग हिरवा तर काही भाग पिवळसर दिसतो. विशेषतः शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात.
या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमार्फत वेगाने होतो. त्यामुळे पांढरी माशी आणि मावा या किडींचे नियंत्रण करणे हे रोगाचा प्रसार रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते.
शेतकऱ्यांनी आता काय करावे? कृषी विभागाने सांगितले ‘हे’ उपाय
१. रोगग्रस्त झाडे तात्काळ उपटा : शेतात सुरुवातीला रोगग्रस्त झाडे आढळल्यास ती त्वरित उपटून शेताबाहेर नेऊन नष्ट करावीत.
२. तणांचे नियंत्रण करा : पिकातील तसेच बांधावरील तणांचे पूर्णपणे नियंत्रण करावे. तणांमुळे किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
३. पिवळे चिकट सापळे लावा : उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी १५ × ३० सेंमी आकाराचे पिवळे चिकट सापळे प्रति एकर १० या प्रमाणात पिकाच्या उंचीनुसार लावावेत.
४. निंबोळी अर्काची फवारणी करा : उगवणीनंतर २० ते २५ दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
५. पांढरी माशी व माव्यावर नियंत्रण : विषाणूचा प्रसार करणाऱ्या पांढऱ्या माशी आणि मावा किडीच्या नियंत्रणासाठी प्रति १० लिटर पाण्यात फ्लुनिकामीड ५० टक्के डब्ल्यू.जी. ३ ग्रॅम किंवा थायोमिथोक्साम २५ टक्के डब्ल्यू.जी. ४ ग्रॅम, यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
पिकावर लक्ष ठेवा...
सोयाबीनमध्ये मोझॅक किंवा पिवळा मोझॅकची लक्षणे दिसल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे वेळीच व्यवस्थापन करणे अधिक महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी नियमितपणे पिकाची पाहणी करून रोगग्रस्त झाडे आणि किडींचा प्रादुर्भाव आढळताच तातडीने उपाययोजना करावी.
वेळीच केलेले व्यवस्थापन सोयाबीन पिकाचे नुकसान कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे ‘रोग वाढल्यानंतर उपाय’ करण्याऐवजी आत्तापासूनच पिकावर लक्ष ठेवण्याचे आवाहन कृषि विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाने केले आहे.