Exclusive : ५३ कोटींचे गौडबंगाल, ७०० बँक खाती संशयास्पद!

कर्मचाऱ्यांनी लावले अंगठे!; १२०० खाती पॅनकार्डशिवाय!!
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्‍यातील एका मोठ्या अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्‍ह सोसायटीतील गौडबंगाल आयकर विभागाने समोर आणले आहे. गेल्या महिन्याच्या शेवटी (२७ ऑक्‍टोबर) या पतसंस्थेच्‍या मुख्यालय आणि अध्यक्षांच्या निवासस्थानी आयकर विभागाने ही कारवाई केली. या कारवाईत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. चौकशीत ५३.७२ कोटी रुपयांचा हिशोब लागला नाही आणि त्‍याबद्दल या पतसंस्थेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी काहीच सांगू  शकलेले नाहीत.

केंद्र सरकारच्या प्रेस इन्‍फॉर्मेशन ब्‍युराेने यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले असून, त्‍यात दिलेली माहिती या पतसंस्‍थेच्‍या एकूण कारभारावर संशय निर्माण करणारी आहे. प्रसिद्धी पत्रकात म्‍हटले आहे, की आयकर विभागाने गेल्या २७ ऑक्‍टोबरला राज्‍यातील एका मोठ्या अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्‍ह सोसायटीच्या मुख्यालयात  आणि एका शाखेत शोध आणि जप्तीची मोहीम राबवली. पतसंस्थेचे अध्यक्ष आणि एका संचालकाच्या निवासस्‍थानीही ही कारवाई करण्यात आली.

कोअर बँकिंग सोल्युशन आणि (CBS) बँक डेटाच्या विश्लेषणावरून आणि कारवाईदरम्यान नोंदवलेल्या  महत्त्वाच्या अधिकारिक व्यक्तीच्या जबाबावरून बँकेत खाती उघडण्यात मोठी अनियमितता झाल्याचे उघड झाले आहे. या पतसंस्थेच्‍या एका शाखेत १२०० पेक्षा अधिक खाती पॅनकार्डशिवाय उघडण्यात आली असून, केवायसी नियमांचे पालनही यासाठी करण्यात आलेले नसल्याचे समोर आले. ही सर्व खाती उघडण्याचे फॉर्म बँक कर्मचाऱ्यांनीच भरले आणि त्यांनीच स्वाक्षरी व अंगठ्याचे ठसे लावले आहेत, हे विशेष.

या सर्व खात्यांमध्ये प्रत्येकी १.९ लाख रुपयांच्या ठेवी असे एकूण ५३.७३ कोटी आढळले आहेत. या पद्धतीची ७०० बँक खाती अशी समोर आली आहेत. ऑगस्ट २०२० ते मे २०२१ या कालावधीत बँक खाते उघडल्यापासून सात दिवसांच्या आत या खात्यात ३४.१०  कोटी रुपये ताबडतोब आले. २ लाख रुपयांपेक्षा जास्त रोख ठेवींसाठी पॅन कार्ड आवश्यक असते. ते टाळण्यासाठी या खात्यांची रचना करण्यात आल्याचे आयकर विभागाच्या तपासणीत समोर आले. नंतर त्याच शाखेत हे पैसे मुदत ठेवींमध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. उल्लेखनीय म्‍हणजे चौकशीत खातेदारांना बँकेतील रोख ठेवींची  माहितीच नसल्याचे समोर आले आहे. या रोख ठेवींचे स्तोत्र चेअरमन, सीएमडी आणि शाखेचे मॅनेजर स्पष्ट करू शकले नाहीत. बँकेच्या एका संचालकांच्या सांगण्यावरून हा सर्व व्यवहार झाल्याचे चेअरमन, सीएमडी व मॅनेजरने मान्य केले. हा संचालक धान्याचा प्रमुख व्यापारी आहे. जमा करण्यात आलेले पुरावे आणि जबाबाच्या आधारे ५३.७२ कोटी रुपये रोखण्यात आले आहेत. सध्या पुढील तपास सुरू आहे.

उद्या वाचा ः "सौम्य किरकिरी' कशासाठी?