दर दोन-तीन महिन्यांनी तिला मिळायचा नवीन नवरा!; पतीच म्‍हणायचा, शुभमंगल सावधान!!
 

 

कोल्हापूर : लाख रुपये घेऊन पतीच पत्‍नीचे लग्न दुसऱ्या लोकांसोबत लावून देत होता... काही दिवस नव्या नवऱ्यासोबत राहिली की पत्‍नी मग सारे दागिने घेऊन पुन्हा आधीच्या पतीकडे येत होती. चौघांची टोळीच यासाठी काम करत होती. अखेर या टोळीला बेड्या पडल्या असून, कोल्हापूर जिल्ह्यातील इंचलकरंजी पोलिसांनी ही कारवाई केली. फिरोज शेख, समीना शेख आणि वैशाली शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे असून, वैशालीचा पती विठ्ठल फरारी आहे. लग्नाळू तरुणांना फसविण्यासाठी या पती-पत्नीच्या जोड्या काम करत होत्या.

राधानगरी तालुक्यातील जोगमवाडी येथील विक्रम केशव जोगम (२४) याने याप्रकरणात तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. जून २०२१ मध्ये विक्रमचे लग्न वैशाली शिंदेसोबत झाले. हे लग्न ठरविण्यासाठी विठ्ठल शिंदे, फिरोज शेख आणि समीना शेख यांनी विक्रमकडून १ लाख ५ हजार रुपये घेतले. वैशालीने आधी लग्न झाल्याचे सुद्धा विक्रमला सांगितले नव्हते. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच वैशाली दागिने घेऊन फरारी झाली होती. त्यानंतर लग्न लावून देणारा विठ्ठल शिंदे हाच वैशालीचा नवरा असल्याचे तरुणाला कळाले. फसवणूक झाल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली.