ब्युटी पार्लर चालवणाऱ्या घटस्फोटीत महिलेवर बलात्कार; तीन लाखांचे दागिनेही केले लंपास

 
पुणे ः ब्‍युटी पार्लर चालवणाऱ्या घटस्‍फोटित ३७ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून उच्‍चशिक्षित युवकाने फसवले. तिच्यावर वारंवार लैंगिक अत्‍याचार केला. लग्न करू म्‍हणून तीन लाखांचे दागिने घेऊन गेला. तिने दागिने परत मागितले तर आपले नको त्या अवस्थेतील फोटो तुझ्या घरच्यांना दाखवेल, अशी धमकी त्‍याने दिली. सांगवी पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दिल्याने पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ऑगस्ट २०१९ ते १४ जानेवारी २०२२ या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडल्याचे  पीडितेने तक्रारीत म्‍हटले आहे.

दीपक आत्‍माराम शेंडगे (रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. पीडितेने दुसऱ्या लग्नासाठी मॅट्रिमोनी वेबसाईटवर नावनोंदणी केली होती. त्या वेबसाइटच्या ॲपवरून दीपकने तिच्याशी संपर्क साधला. दीपकने लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. नंतर वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्‍याचार त्‍याने केला. वेगवेगळी कारणे सांगून एक लाख ९० हजार रुपये रोख त्‍याने घेतले.

एक लाख ७० हजार रुपये ऑनलाइन घेतल्याचे पीडितेने तक्रारीत म्‍हटले आहे. ३० सप्टेंबर २०१९ ला ती घरी नव्‍हती. दीपकने त्याच्याकडील चावीने घर उघडून तीन लाख रुपये सोन्याचे दागिने तिच्या नकळत घेऊन गेला. तिने दागिने परत मागितले असता दोघांचे फोटो तुझ्या घरच्यांना दाखवेल, अशी धमकी त्याने दिली. त्‍याचे ब्‍लॅकमेलिंग वाढत चालल्याने महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.