शरीरसंबंध ठेवून लग्नाला नकार म्हणजे फसवणूक नाही
हायकोर्टाकडून प्रियकराची निर्दोष मुक्तता
Dec 22, 2021, 11:33 IST
मुंबई : सज्ञान असताना परस्पर संमतीने शरीरसंबंध ठेवल्यानंतर लग्नाला नकार दिल्यास त्याला फसवणूक म्हणता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरवलेल्या तरुणाची निर्दोष मुक्तता केली आहे. तरुणाच्या प्रेयसीने त्याच्याविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
काशिनाथ असे प्रियकराचे नाव आहे. काशिनाथने लग्नाचे आश्वासन देऊन त्याच्या प्रेयसीसोबत तीन वर्षे शरीरसंबंध ठेवले. मात्र लग्नाला नकार देऊन फसवणूक केल्याचा त्याच्या प्रेयसीचा दावा होता. मात्र न्यायालयाने सर्व साक्षी व पुरावे ऐकल्यानंतर काशिनाथ आणि त्याची प्रेयसी तीन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. तिची फसवणूक करून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले असल्याचे दिसून आले नाही. दोघेही सज्ञान होते. परस्पर संमतीने त्यांनी शरीरसुखासाठी संबंध ठेवले होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या कालावधीसाठी नात्यात राहून परस्पर संमतीने सोबत शरीर संबंध ठेवल्यास नंतर लग्नाला नकार दिल्यास याला फसवणूक म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. अशा प्रकरणात आरोपीने खोटी माहिती देऊन महिलेला लग्नाचे आमिष दाखवले, हे सिद्ध होणे गरजेच आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.