लाडक्या बहिणींच्या' खात्यात अजूनही नाही हप्ता; केव्हा जमा होईल हप्ता बातमीत वाचा...

 
 मुंबई (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत लाखो महिलांना दरमहा १५०० रुपये सन्मान निधी दिला जातो. गेल्या अनेक महिन्यांपासून हा निधी नियमितपणे जमा होत होता. मात्र एप्रिल महिना संपला तरी महिलांच्या खात्यावर हप्ता जमा झाला नसल्याने सध्या राज्यभरात संभ्रमाचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हा हप्ता खात्यात जमा केला जाईल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले होते. त्यामुळे महिलांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु सध्या त्यांचे बँक खाते मात्र शांत आहे.
राज्यभरातील कोट्यवधी लाडक्या बहिणी हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकांनी याबाबत सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. महिलांचे म्हणणे आहे की, “सरकारने वचन दिले होते, मग निधी अजून मिळत का नाही?”
अशातच..शेवटी, आता खुद्द महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली नवी माहिती बाहेर आली आहे.
त्यांनी स्पष्ट केलं आहे की,
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. येत्या २ ते ३ दिवसांत सर्वांच्या खात्यात पैसे जमा होतील.”
राज्यभरातील २ कोटी ४७ लाख लाभार्थींना दिलासा मिळणार असून, येत्या काही दिवसांत हप्ता त्यांच्या खात्यात झळकणार आहे.