बुलडाणा अर्बनमध्ये धाडसी चोरी!; कोट्यवधीची लूट!!

 

जालना (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा अर्बन पतसंस्‍थेच्या शहागड (ता. अंबड, जि. जालना) येथील शाखेत काल, २८ ऑक्‍टोबरला सायंकाळी पाचच्या सुमारास सिनेस्‍टाइल धाडसी चोरी घडली. तीन चोरांनी बंदुकीचा धाक दाखवून २५ लाख रुपये रोख, एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे सोन्याचे दागिने लुटून पोबारा केला.

औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर पतसंस्‍था आहे. एवढा रहदारीचा रस्‍ता असूनही भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. अवघ्या आठ मिनिटांत चोरटे आले आणि गेले. आल्यानंतर आधी त्‍यांनी पतसंस्‍थेचा दरवाजा बंद केला. ७ कर्मचाऱ्यांवर बंदूक रोखली. एकेक करून सर्वांना स्‍ट्राँग रूममध्ये कोंडले. कानशिलाला बंदूक लावून लॉकरची चावी घेतली आणि लॉकरमधील २५ लाख रुपये रोख, ग्राहकांनी तारण ठेवलेले दोन लॉकरमधील अंदाजे एक कोटी रुपयांचे सोने घेऊन त्‍यांनी पळ काढला.

चोरटे जाताच कर्मचाऱ्यांनी जवळपासच्‍या नागरिकांना संपर्क केला. घटनेची माहिती मिळताच शहागड व गोंदी पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. मात्र ते हाती लागले नाहीत. गेवराई, जालना, औरंगाबाद, पैठण येथील पोलिसांनाही या चोरीबद्दल सांगून नाकेबंदीच्‍या सूचना देण्यात आल्या होत्या. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी सांगितले, की चोरीच्‍या तपासासाठी चार पथके नेमली आहेत. बँकेची नेमकी किती रक्‍कम गेली याची मोजदाद अजून व्‍हायची आहे. १७ पैकी केवळ तीन लॉकर्सच चोरट्यांनी खाली केले आहेत. कोट्यवधीचे दागिने गेले असे सध्या तरी म्‍हणता येणार नाही.

चोरटे सीसीटीव्‍हीत कैद..पण मास्क लावलेले...
चोरटे बँकेत लावलेल्या सीसीटीव्‍ही फूटेजमध्ये कैद झाले आहेत. मात्र त्‍यांनी मास्‍क लावलेले होते. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, अंबडचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, एलसीबीचे पोलीस निरिक्षक सुभाष भुजंग यांनी घटनास्‍थळी पाहणी केली.