कौर्याची परिसीमा! प्रेमविवाह केलेल्या बहिणीचे शीर धडावेगळे केले..!!

शीर घराबाहेर हातात आणून म्‍हणाला, बघा तिला मारले!!, आज दुपारची औरंगाबादची थरारक घटना
 
 
औरंगाबाद (लाइव्ह औरंगाबाद वृत्तसेवा) ः प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून अल्पवयीन भावाने आईच्या मदतीने बहिणीच्या गळ्यावर कोयत्याचे सपासप वार करून शीर धडावेगळे केले. कौर्याची परिसीमा गाठणारी ही घटना वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात आज, ५ डिसेंबरला दुपारी घडली. शीर घराबाहेर हातात आणून बघा तिला मारले असे म्हणत ते तेथेच टाकून दिले. विशेष म्हणजे बहिणीची हत्या केल्यावर दोघे मायलेक मोटरसायकलीवरून वैजापूर पोलिसात स्वतःहून हजर झाले. या प्रकरणी वीरगाव पोलिसांत अल्पवयीन मुलासह आईविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोरी ऊर्फ कीर्ती अविनाश थोरे (१९, रा. गोयगाव ह. मु. लाडगाव शिवार, वैजापूर ) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे. शोभा संजय मोटे व त्यांचा अल्पवयीन मुलगा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गोयगाव येथील संजय मोटे हे पत्नी व मुला-मुलीसह नगीना पिंपळगाव शिवारात शेतवस्तीवर राहतात. याच गावातील लाडगाव शिवारात शेत गट क्र. ३०७ मध्ये राहणाऱ्या अविनाश संजय थोरे याचे व किशोरी उर्फ कीर्ती मोटे या दोघांचे प्रेमसंबंध होते. किशोरी १७ जुलै २०२१ रोजी रात्री १० वाजेला घरातून निघून गेली होती. याप्रकरणी पालकांनी ती हरवल्याची तक्रार वैजापूर पोलिसांत दिली होती.

त्या तपासात तिने अविनाश थोरे याच्यासोबत प्रेमविवाह केल्याचे समोर आले होते. ती सज्ञान असल्याने पोलिसांनी तिला २२ जुलै रोजी पती अविनाशच्या ताब्यात दिले होते. तिची या प्रकरणात कोणाविरुद्धही काहीही तक्रार नव्हती. दरम्यान, प्रेमविवाह केल्यावर ते दोघेही अविनाशच्या घरी सुखाने नांदत होते. गेल्या आठवड्यात किशोरीची आई शोभा ही तिला भेटण्यासाठी सासरी येऊन गेली होती. त्यानंतर आज दुपारी ती आपल्या मुलासोबत अविनाशच्या घरी आली. अविनाश आजारी असल्याने घरात झोपलेला होता, तर त्याचे आई- वडील व अन्य कुटुंबीय घरासमोरील शेतात कांद्याची लागवड करत होते. आई व भाऊ भेटायला आल्याने किशोरी ही शेतातील काम बाजूला ठेवून घरात आली होती. त्या दोघांना चहा करण्यासाठी ती किचनमध्ये गेलेली असताना आई व भाऊही तिच्या मागे आले. आई शोभा यांनी किशोरीचे पाय धरले तर भावाने सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्या गळ्यावर सपासप चार वार करून धड शिरापासून दूर केले.

किशोरीचा ओरडण्याचा आवाज ऐकून अविनाश जागी झाला. मात्र या मायलेकांचा रुद्रावतार पाहून तो घरातून बाहेर पळून गेला. मृत किशोरीचे शीर हातात घेऊन तिचा भाऊ बाहेर ओट्यावर आला व समोर शेतात काम करणाऱ्यांना बघा तिला मारून टाकले असे म्हणू लागला. त्यावेळी घराच्या पायऱ्यावरी बसलेली अविनाशची आज्जी नातसुनेचे शीर पाहून तेथेच स्तब्ध बसून राहिली. त्यांचा आवाज ऐकून अविनाशचे आई वडील व कुटुंबिय या ठिकाणी जमा झाले. तोपर्यंत हे दोघे मायलेक तेथून पसार होऊन मोटरसायकलने वैजापूर पोलिसांत हजर झाले. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस या ठिकाणी दाखल झाले. मात्र घटनास्थळ वीरगाव हद्दीत असल्याने त्यांनी याची माहिती वीरगावचे सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवडे यांना दिली. त्यानंतर वीरगावचे पोलीस या ठिकाणी रवाना झाले. विवाहितेचे शीर छाटून टाकल्याचे समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

अंगुलीनिर्देश व श्वान पथक या ठिकाणी दाखल झाले. वीरगाव पोलीस ठाण्याचे राहुल थोरात, किशोर आघाडे, विशाल पडळकर, सागर शिंदे, हरिष सोनवणे, गोपाल जोनवाल, दिनेश गायकवाड, उमेश जाधव, अजयसिंह गोलवाल यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर जि.प.सदस्य पंकज ठोंबरे, लाडगावचे ऋतुराज सोमवंशी यांनी तेथे धाव घेतली. ठोंबरे यांनी मृतदेह नेण्यासाठी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. पंचनामा केल्यावर सायंकाळी पोलिसांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. दरम्यान, वैजापूर पोलिसांत हजर झालेल्या या मायलेकांना वीरगाव पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतले. या प्रकरणी मृत विवाहितेचा पती अविनाश संजय थोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीरगाव पोलिसांत अल्पवयीन मुलगा व त्याची आई शोभा संजय मोटे या दोघांवर हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवडे करत आहे.