अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्याचे प्रयत्‍न!
 

 
नांदेड : अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्‍न करणार असल्याचे वक्‍तव्‍य काँग्रेस नेते भास्‍करराव पाटील खतगावकर यांनी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
विधानसभेच्‍या देगलूर मतदारसंघाच्‍या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर विजयी झाल्यानंतर खतगावकर यांनी आनंद व्यक्‍त करताना भावना व्यक्‍त केल्या. भाजप उमेदवार सुभाष साबणे यांचा अंतापूरकरांनी ४१ हजार ९३३ मतांनी पराभव केला आहे. खतगावकर म्‍हणाले, की अशोक चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वांमुळेच अंतापूरकर यांचा विजय झाला. आम्‍हाला अशोक चव्हाण यांना पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पाहायचे आहे. जनतेनेही तसा कौल आता दिला असून, त्‍यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी जिवाचे रान करून, असे ते म्‍हणाले. अशोक चव्‍हाण यावेळी म्‍हणाले, की भाजपने खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. मात्र मतदारांनी साथ दिली नाही. विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवल्याचे चव्हाण म्‍हणाले.