अस्सा चहा...  प्यायला लागतीये रांग..! म्‍हणे आहे आयुर्वेदिक चहा!!

 
यवतमाळ : तुम्ही कधी आयुर्वेदिक चहा ऐकलाय? नाही ना? मग आम्ही सांगतो! यवतमाळला आयुर्वेदिक चहा मिळतो जिल्हा न्यायालय परिसरातील एका टपरीवर.

रामाजी वेट्टी यांची ही चहाची टपरी आहे. त्‍यांच्या आयुर्वेदिक चहाचे यवतमाळकर तर अक्षरश: दिवाने झाले आहेत. गूळ, अद्रक, हळद आणि आयुर्वेदिक मसाला घालून ते आयुर्वेदिक चहा तयार करतात. काळा चहा असल्याने ॲसिडिटी होत नाही. त्यामुळे हा चहा ॲसिडिटीवर रामबाण उपायच म्हणा.

कायम या दुकानावर गर्दीच असते. वकील, कर्मचारी, पोलीस, अधिकारी, सामान्य लोक चहा पिण्यासाठी रामाजी यांच्या कॅन्टीनवर जातात. १९८० ला त्यांनी ही चहाची टपरी सुरू केली होती. चाळीस वर्षांपासून त्याचा हाच व्यवसाय आहे. याच्या भरवशावर त्यांनी तीन मुली अन्‌ एका मुलाला चांगलं शिकवलं अन्‌ त्यांचं लग्नही केलं.

याच व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचा संसार सुरू आहे. त्यांच्या ब्लॅक टी ची ऑर्डर शहरात अनेक ठिकाणी दिली जाते. गूळ, अद्रक, जलजिरा, सेंद्रीमिठ, लिंबू, हळद, आयुर्वेदिक मसाला टाकून बनवलेला चहा हा भारीच. कधी यवतमाळ जिल्ह्यात गेलेच तर एकदा पिऊनच या...