अरेव्वा... माजी आमदार चक्क ग्रा. पं. सदस्य होणार!

 
अकोला : ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, आमदार-खासदार अशा चढत्या क्रमाची निवडणूक लढण्याची स्वप्ने सारेच राजकारणी पाहत असतात.


ग्रामपंचायत सदस्यापासून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारे विलासराव देशमुखांसारखे नेते महाराष्ट्राने बघितले आहेत. मात्र आमदारकी भोगलेल्या व्यक्तीने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उडी घ्यावी, हे अशक्यच. पण चक्‍क तसे घडलेय! अकोला जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांनी चक्क ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उडी घेतली.

आपल्याच मतदारसंघातील मरोडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संजय गावंडे यांनी सदस्यपदासाठी अर्ज भरला. त्यांच्या विरोधात कुणीही अर्ज न भरल्याने ते बिनविरोध ग्रामपंचायतीचे सदस्य होणार आहेत. अकोट तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या ८२ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. संजय गावंडे यांचा २०१४ मध्ये भाजपच्या प्रकाश भारसाकळे यांनी पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी आता रिव्हर्स गिअर टाकून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. अकोट तालुक्यातील कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या राजकारणासाठी गावंडे यांनी ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.